• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दरोडेखोरांना फिल्मी स्टाईलने अटक

ByEditor

Jul 14, 2023

• स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागची कारवाई
• 10 तोळे सोनेसह कार जप्त; दरोडेखोरांवर राज्यात 29 गुन्हे दाखल

देवा पेरवी
पेण :
शहरातील जगदंबा सिद्धी अपार्टमेंट चिंचपाडा व रामवाडी येथील बिल्डिंग मध्ये घुसून घरफोडी करणाऱ्या सांगली येथील सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागच्या पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेले 10 तोळे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली होंडा कार ताब्यात घेण्यात आली आहे. या सराईत दरोडेखोरांवर राज्यात एकूण 29 गुन्हे दाखल आहेत.

सविस्तर वृत्त असे की, 7 जुलै रोजी दुपारच्या वेळेत पेण शहरातील चिंचपाडा मधील जगदंबा सिद्धी अपार्टमेंट व रामवाडी येथील साई सृष्टी अपार्टमेंट या बिल्डिंग मध्ये घुसून स्क्रुड्रायव्हरच्या साहाय्याने दरवाजाची कडी तोडून घरात घुसून घरफोडी करणाऱ्या सांगली येथील सराईत गुन्हेगार लोकेश रावसाहेब सुतार वय-30 व अरुण वसंत पाटील वय-26 दोन्ही राहणार लिंगनूर, ता.मिरज, जि. सांगली यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अलिबागच्या पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत अटक केली आहे. सदर गुन्हेगार हे नगर, मुरबाड, कल्याण मार्गे पनवेल वरून पेण येथे चोरी करण्यासाठी दाखल झाले. यावेळी त्यांनी चिंचपाडा व रामवाडी येथे रेकी करून वरील दोन्ही बिल्डिंग मधील बंद असलेल्या फ्लॅट मध्ये घुसून घरफोडी केली. यावेळी त्यांनी 3 लाख 29 हजार रुपयांचे 10 तोळे सोने चोरले. घरफोडी केल्यानंतर महाड, महाबळेश्वर मार्गे सदर चोर सांगली येथे पळून गेले.

या घरफोडीचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागच्या पोलिसांची एक टीम मिरज, सांगली येथे रवाना झाली. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज व बातमीदारांच्या माहिती नुसार लिंगनूर गावात दोन दिवस दबा धरून तपास करत असताना सदर चोरांनी फिल्मी स्टाईलने घरांवरून उद्या मारीत पळण्याचा प्रयत्न केला व एका खंडर मध्ये जाऊन लपले. यावेळी अलिबाग पोलिसांनी सापळा रचून कसोशीने शोध घेऊन सदर चोरांच्या मुसक्या आवळल्या.

यावेळी अलिबाग पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवीत अधिक तपास केला असता त्यांच्याकडून चोरी केलेले 3 लाख 29 हजार रुपयांचे 10 तोळे सोने व दरोड्यात वापरण्यात आलेली MH-10-DG-6774 क्रमांकाची 8 लाख किंमतीची होंडा कार असे एकूण 10 लाख 82 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. सदर दरोडेखोरांवर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी 29 गुन्हे दाखल आहेत.

पेण येथे झालेल्या सदर घरफोडीचा तपास रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक धनाजी साठे, पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण, विकास खैरनार, पोलीस शिपाई लालासो वाघमोडे यांनी केला आहे. आपल्या आयुष्यभराच्या कष्टाचे सोन्याचे दागिने फक्त चार दिवसांत मिळाल्याने रायगड पोलिसांचे कौतुक होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!