• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नगरपालिकेने सार्वजनिक रस्ताही बिल्डरांना दिला आंदण!

ByEditor

Aug 14, 2024

घनःश्याम कडू
उरण :
उरण नगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात इमारती उभारण्याचे काम सुरू आहे. बिल्डरांनी नाले तर ताब्यात घेतले आहेतच आता रस्त्यावरही खुलेआम अतिक्रमण करीत आहेत. याकडे नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे नगररचनाकार पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. याबाबत विचारणा केली असता मला माहित नाही किंवा कोणी तक्रार केली नाही असे उत्तर मिळत आहे.

नगरपालिका हद्दीतील इमारती जुन्या व धोकादायक झाल्याने त्या पुनर्विकास करण्यासाठी बिल्डरांनी घेतल्या आहेत. काहींनी कामेही सुरू केली आहेत. परंतु ही कामे करीत असताना दिवस-रात्र कामांचा आवाज येऊन आसपासच्या रहिवाशांना याचा त्रास होत आहे. त्याचबरोबर माती उत्खनन करून त्याची परस्पर विक्री केली जात आहे. एवढेच नाहीतर सार्वजनिक रहदारीचा रस्ता व शाळेच्या परिसरातील रस्त्यावरून मातीची वाहतूक केली जात असल्याने रस्त्यावर मातीचे ढीग साचून पावसात रस्ता चिखलमय होत आहे. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत नगरपालिकेचे नगररचनाकार निखिल ढेरे यांच्याकडे विचारणा केली असता ते आमच्याकडे अशी कोणीच तक्रार केली नसल्याचे सांगतात. परंतु, कामास परवानगी दिल्यानंतर नियमानुसार काम सुरू आहे किंवा नाही याची कोणतीही पहाणी करणे त्यांना आवश्यक वाटत नाही. बांधकाम करताना मटेरियल हे जागेवरच मिक्स करणे आवश्यक असताना बिल्डर बाहेरून मिक्सर ट्रकमध्ये आणून रहदारीच्या रस्त्यावरच उभे करून बांधकाम केले जात आहे. यावरून नगरपालिकेने रस्ताही बिल्डरांना आंदण दिला असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे. तसेच नजीकच हायस्कुल असल्याने वाहतूक कोंडी होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मातीची वाहतूक हा महसूल विभागाचा प्रश्‍न असल्याने याबाबत तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्याकडे विचारणा केली असता ते ही याबाबत काहीच बोलण्यास तयार नाहीत. मग खोदकाम करून मातीची वाहतूक सुरू असतानाही याबाबत कोणताच जबाबदार अधिकारी उत्तर देत नसल्याने संशयास्पद वाटत आहे. तरी रायगड जिल्हाधिकारी यांनी याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!