गणेश वाघरे शाळेची उत्तुंग भरारी
मजिद हजिते
माणगाव : माणगाव येथील शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात अतुलनीय पराक्रम करणार्या माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या गणेश वाघरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी तनय ज्ञानेश्वर उतेकर याने दिल्ली येथील गुडगाव येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील आईस स्केटिंग स्पर्धेत १६ वर्षाच्या आतील गटात सुवर्ण पदक पटकावले. त्यामुळे तनय उतेकर याची निवड स्विडन येथे होणाऱ्या जागतिक मिनी ऑलिंपिकसाठी निवड करण्यात आली आहे. आपल्या प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर हे यश खेचून आणले आहे. त्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.
माणगाव येथील गणेश वाघरे शाळेच्या तनय उतेकर याने या स्पर्धे अगोदर गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आईस स्केटिंग स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला तर दिल्ली येथे दुसरा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर दिल्ली येथील गुडगाव येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील आईस स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. प्रत्येक स्पर्धेत तनय उतेकर याने आपला खेळ अधिक उंचावून उत्तुंग भरारी घेत सुवर्ण यश संपादन केले.
गणेश वाघरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, सर्व संचालक मंडळ, प्रशिक्षक संजय गमरे, शाळेचे चेअरमन अरुण पवार, मुख्याध्यापिका मनिषा मोरे, सर्व शिक्षकांनी तनय यास सर्वोतोपरी सातत्याने प्रोत्साहन देऊन या स्पर्धेसाठी सहकार्य केले. तनयला माणगाव किंवा रायगडमध्ये बर्फाची कोणतीही सुविधा नसताना सुद्धा केवळ जिद्दीच्या जोरावर आणि आत्मविश्वासावर त्याने मिळविलेले हे यश दुर्मिळच ठरले आहे. सुविधा नाहीत म्हणून त्याचे पाय थांबले नाहीत. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्याने अशोकदादा साबळे विद्यालयाच्या व्हरांड्यात तसेच शिपुरकर आणि वाघरे शाळेच्या टेरेसवर सतत सराव सुरुच ठेवला.
वाघरे शाळेच्या इयत्ता सातवीत शिकत असणाऱ्या विनम्र स्वभावाच्या तनय उतेकर याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे आजोबा परशूराम उतेकर यांनी आपल्या लाडक्या नातवाला एक वेगळा खेळ खेळण्यासाठी स्केटिंगचे साहित्य आणून भेट दिले. त्या दिवसापासून तनयला स्केटिंगची आवड निर्माण झाली आणि त्याने सुवर्ण पदक मिळवून आपल्या शाळेचे, तालुक्याचे आणि रायगड तसेच महाराष्ट्राचे नाव उज्वल केले आहे. आता त्याची निवड ऑलिंपिक पूर्वी ” खेलो इंडिया ” साठी झाली असून तेथे तनय तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करणार आहे.
तनय उतेकरला स्विडन येथे होणाऱ्या जागतिक मिनी ऑलिंपिकसाठी अध्यक्ष राजीव साबळे, सर्व संचालक मंडळ, चेअरमन अरुण पवार, मुख्याध्यापिका सौ. मनिषा मोरे, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी तनयला हार्दिक शुभेच्छा दिल्या.