आमदार चषक उरण जलतरण स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटात मिळविले प्राविण्य
सलीम शेख
माणगाव : ७८व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ता. १५ ऑगस्ट २०२४ स्वतंत्रदिनी आमदार महेश बालदी, उरण नगरपरिषद, हौशी जलतरण संघटना उरण यांच्या संयुक्त विद्यमाने जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत लीड स्कूल मुगवली, माणगाव येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये कुमारी ध्रुवी राजेंद्र खाडे हिने १४ वर्षाखालील वयोगटातील ५० मीटर फ्री स्टाइल, ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक जलतरण प्रकारात तीन रौप्य व ५० मिटर बटरफ्लाय या जलतरण प्रकारात एक सुवर्ण पदक जिंकून आपले जलतरण विभागातील स्थान उंचावले आहे.
दहा वर्षाखालील वयोगटातील कुमारी हीरल संजोग शेठ हिने ५० मीटर फ्रीस्टाइलमध्ये रौप्य पदक प्राप्त करून पदकाचे खाते उघडले आहे. तसेच बारा वर्षाखालील वयोगटातील कुमार अर्णव राजेंद्र खाडे, कुमार नभिया नाथांनी, कुमार मोईन हसन कुमारी तनिष्का वाकलेकर, आठ वर्षा खालील वयोगटातील कुमार आयांश वाकलेकर व कुमार शौर्य समीर म्हामुनकर आदी जलतरणपटू सहभागी झाले होते. या सर्व जलतरणपटूंना उत्तम प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय जलतरण खेळाडू तथा प्रशिक्षक अभिनंदन तानाजी दळवी देत आहेत. याकरिता माणगाव तालुक्यातील मौजे भादावमधील साई मँगो रिसॉर्टचे मालक मंगेश निंबाळकर यांनी त्यांचे स्विमिंग पूल मुलांना जलतरण प्रशिक्षणाकरिता उपलब्ध करून दिले आहे.