रोहा तालुक्यातील वांगणी येथील तरुणीचा जागीच मृत्यू, दुचाकीस्वार जखमी
सलीम शेख
माणगाव : माणगावपासून चार किलोमीटरवर असणाऱ्या गारळ गावच्या हद्दीत एचपी पेट्रोल पंपाच्या पुढे मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव ट्रकची ज्यूपिटर स्कुटीला मागच्या बाजूने जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणीचा जागीच मृत्यू होऊन दुचाकीस्वार जखमी झाला आहे. सदरचा अपघात शनिवार, दि. १७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८:४५ वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबतची फिर्याद वसंत बाळू भिसे (वय ६० सध्या रा. रापीजी कॉम्प्लेक्स महाड, मूळ रा. वांगणी ता. रोहा) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, यांतील फिर्यादी वसंत बाळू भिसे हे त्यांच्या मालकीची टीव्हीएस ज्यूपिटर स्कुटी क्र. एमएच ०६ सीजे ३७०४ हि गाडी महाड ते धाटाव ता. रोहा येथे मागील सीटवर मयत तरुणी सोनाली धनंजय भिसे (वय-२९, सध्या रा. रापीजी कॉम्प्लेक्स महाड, मूळ रा. वांगणी, ता.रोहा) यांना घेऊन मुंबई-गोवा महामार्गाने जात असताना अपघात ठिकाणी आल्यावर यांतील आरोपी रुपेश सूर्यकांत इनामदार (वय -४४, रा.नंदीमाळ नाका, ता.पेण) याने त्याचे ताब्यातील ट्रक क्र.एमएच ०६ एक्यू ५७९३ हि गाडी अतिवेगाने चालवून स्कुटीला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात स्कुटीच्या पाठीमागे बसलेली तरुणी सोनाली धनंजय भिसे हीचा जागीच मृत्यू झाला तर स्कुटी चालक वसंत बाळू भिसे हे जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं. १९५/२०२४ भादवी कलम १०६ (१),२८१,१२५ अ,१२५ ब मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे करण्यात येऊन आरोपी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले हे करीत आहेत.