• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अर्धवट कॉक्रीटीकरण प्रवाशांच्या मुळावर!

ByEditor

Jul 14, 2023

माणगाव बसस्थानक आवारातील खड्ड्यातील चिखलातून प्रवाशांची पायपीट

सलीम शेख
माणगाव :
मुंबई-गोवा महामार्गावरील महत्वाचे असणाऱ्या माणगाव बसस्थानक आवारात गेले अनेक दिवस प्रवासी नागरिक बसस्थानकात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांशी सामना करीत आहेत. याकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रशासनाने अक्ष्यम्य डोळेझाक चालवली आहे. या बसस्थानकात पडलेल्या खड्ड्यामध्ये शिंदे गट शिवसेना जिल्हाप्रमुख युवासेना द. रायगड विपुल उभारे, यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते. त्यानंतर आ. भरत गोगावले यांनी पाठपुरावा करीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून निधी उपलब्ध करून घेतला होता. हा निधी अपुरा पडल्याने बसस्थानकात कॉक्रीटीकरण करण्यात आले होते. मात्र अपुऱ्या निधीमुळे बसस्थानकातील उर्वरित जागेवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे माणगाव बसस्थानक आवारातील खड्ड्यातील चिखलातून प्रवाशांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे हे अर्धवट कॉक्रीटीकरण प्रवाशांच्या मुळावर आले आहे.

नागरिकांची समस्या लक्षात घेता माणगाव बसस्थानकातील कॉक्रीटीकरणासाठी १६ लाख रुपये आ. भरत गोगावले यांनी पाठपुरावा करून मंजुर करुन घेतला. हा निधी अपुरा पडल्याने उर्वरित काम दुसऱ्या टप्यात केले जाईल. असे आश्वासन आ. गोगावले यांनी दिले होते. उर्वरित बसस्थानक आवार खड्डेमुक्त करण्यासाठी आणखीन निधीची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे होते. मात्र उर्वरित पुरेसा निधी उपलब्ध झाला नसल्यामुळे बसस्थानकात खड्डे पडले असून या खड्यात चिखल आणि गाळ साचल्याने प्रवासी नागरिकांना या चिखलातूनच बसस्थानकात जाण्यायेण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. शासनांनी जिल्हातील बसस्थानके सुशोभीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केल्याची घोषणा केली आहे. त्यानुसार या बसस्थानक आवारातील उर्वरित कॉक्रीटीकरण पूर्ण करणे, गटारे कॉक्रीटीकरण, बस आगाराचे कॉक्रीटीकरण करण्याचे नियोजन आहे. मात्र याला आता आणखी कांही दिवस वाट पहावी लागणार असली तरी प्रवाशांना मात्र बसस्थानकातील चिखल आणि खड्यातील साचलेल्या पाण्याशी तोंड द्यावे लागत आहे.

आ. भरत गोगावले यांच्या माध्यमातून राज्य परिवहन महामंडळाकडे पाठपुरवा केल्यानंतर निविदा मंजुर करण्यात आली होती. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी संबंधित ठेकेदाराला कामाची वर्कऑर्डर देवून काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले होते. हा निधी अपुरा असल्याने बसस्थानकातील समस्या प्रवाशांना अधिकच भेडसावू लागल्या. माणगाव बसस्थानक आवारात पावसाळयापूर्वी पुरेसा निधी उपलब्ध करून काँक्रिटीकरण पूर्ण करणे गरजेचे होते. त्यामुळे कॉक्रीटीकरण झालेल्या भाग उंच व कॉक्रीटीकरण न झालेला भाग खड्ड्यात अशी स्थिती आहे. प्रवासी नागरिकांना बसस्थानकात जाने व येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुंबई–गोवा महामार्गावरील व दिघी–पुणे मार्गावरील माणगाव बसस्थानक महत्त्वाचे असून या बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ असते. त्या प्रवाशांना सर्व पायाभूत सुविधा मिळण्यासाठी बसस्थानक व बस आगारात विविध सुविधांच्या विकासासाठी शिवसेना पक्षप्रतोद आ. भरत गोगावले यांनी निधी मंजुरीची प्रक्रिया प्रगती पथावर असून येत्या १५ ते २० दिवसाच्या आत निधी मंजूर होवून निविदा प्रक्रियेला सुरवात होईल.

विपुल उभारे
जिल्हाप्रमुख युवासेना दक्षिण रायगड

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!