स्व खर्चाने करणार बांधकाम पूर्ण
क्रीडा क्षेत्रात कणे गावाचे नाव देशात चमकायला हवे – वैकुंठ पाटील
विनायक पाटील
पेण : मी राजकीय हेतूने कधीच काम केले नाही. कणे गावातील माझ्या जिवाभावाच्या माणसांसाठी व्यायामशाळेचे काम माझ्या हातून होणे होते याचा मला सार्थ अभिमान आहे. कणे आणि कबड्डी याचे नाते अतूट आहे. क्रीडा क्षेत्रात कणे गावाचे नाव देशात चमकायला हवे अशा भावना रायगड जिल्हा भाजप उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी व्यक्त केल्या. आज रविवार दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी कणे गावच्या व्यायामशाळेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. ही व्यायामशाळा ते स्वखर्चाने बांधून देणार आहेत.

तालुक्यातील कणे हे गाव कबड्डीची पंढरी म्हणून ओळखले जाते. कणे गावाने गोपीनाथ पाटील, देविदास पाटील, मारुती म्हात्रे, चंद्रकांत भोईर हे राष्ट्रीय खेळाडू दिले आहेत. गावातील झुंझार व्यायामशाळा गेली ३० ते ३५ वर्ष जुनी असून आता मोडकळीस आलेली असल्याने गावातील तरुण आणि खेळाडू यांची मोठी अडचण होत होती. याबाबत तरुणांच्या कमिटीने पेण तालुकयात विकासकामांची गंगा आणणाऱ्या माजी जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते वैकुंठ पाटील यांच्याकडे मागणी करण्याचे ठरवले. नुकतेच गावात आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून काँक्रिट रस्त्याचे काम झाल्याने त्याच्या उद्घाटन प्रसंगी रायगड जिल्हा भाजप उपाध्यक्ष युवा नेते वैकुंठ पाटील आले असता गावातील तरुणांनी, ग्रामस्थांनी व्यायामशाळा बाबत त्यांच्याकडे व्यथा मांडली. वैकुंठ पाटील यांनी संवेदनशीलपणे तत्काळ स्व:खर्चाने ही व्यायामशाळा बांधून देण्याचे ग्रामस्थांना आश्वस्त केले. त्यानुसार कार्यतत्परपणे आज १८ ऑगस्ट २०२४ रोजी प्रत्यक्ष कामाला सुरवात सुद्धा केली. या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर व्याघ्रेश्वर मंदिरात झुंझार कबड्डी संघाचे अध्यक्ष बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी एकमताने वैकुंठ पाटील यांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले. यावेळी बोलताना वैकुंठ पाटील पुढे म्हणाले की, हमरापुर विभागात खेळाचे मैदान न्हवते आ. रविशेठ पाटील यांनी एक कोटीचा निधी दिला त्यात स्वतः ३२ लाख रुपये घालून क्रीडांगणाचे काम पूर्ण करून घेतले. त्यामुळे अनेक अग्निदिव्य पार पाडली असून ही कामे वेळेपूर्वीच करून घेवू असेही त्यांनी अश्वस्थ केले.
आर जे म्हात्रे यांनी यावेळी बोलताना वैकुंठ पाटील यांचे कणे गावावर नितांत प्रेम असून त्यांनी अनेक विकास कामे गावात केली असल्याचा आवर्जून उल्लेख केला. या कार्यक्रम प्रसंगी गावचे उपसरपंच जयवंत बांधनकर, सदस्य देविदास पाटील, माजी सरपंच कुणाल पाटील, माजी उपसरपंच भाजप महिला पदाधिकारी प्रचीता पाटील, सामाजिक कार्यकर्ते नंदू पाटील, काँग्रेस नेते आर जे म्हात्रे, शेकाप ज्येष्ठ नेते शांताराम भोईर, संभाजी पाटील, शामकांत पाटील, माजी ग्रा. सा धीरज पाटील, गाव अध्यक्ष विजय पाटील, प्रभाकर पाटील, राहुल पाटील, जयंता म्हात्रे, निलेश म्हात्रे, संतोष म्हात्रे, विनोद म्हात्रे, भगवान पाटील, कल्पेश पाटील हरिदास पाटील, नितेश म्हात्रे, नवनाथ म्हात्रे, केशव काळे, आदी मान्यवरांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.