प्रतिनिधी
पेण : शिवतेज युवा फाऊंडेशन रायगड, संस्थेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या पुस्तकपेढी योजनेच्या माध्यमातून सलग दुसऱ्या वर्षी देखील समाजातील सुमारे 35 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून पुस्तके व वह्या वाटप करण्यात आले. यामध्ये 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण पुस्तकांचा संच देण्यात आला. यासाठी वाशी गावातील सामाजिक कार्यकर्ते जयसन पाटील यांनी आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त रोख रक्कम 10,000/- (दहा हजार रुपये)ची पुस्तके भेट दिली. तसेच वाशी गावातील दानशूर व्यक्तिमत्व शशिकांत मढवी यांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चिरंजीव शेखर मढवी यांनी वह्या भेट दिल्या.

पुस्तक पेढी योजनेच्या या शैक्षणिक उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार प्रदीप पाटील, परिष पाटील, ऍड. महेश देसले , प्रचिती पाटील यांनी मोलाचे अर्थ साहाय्य केले. पुस्तके, वह्या यांचे वितरण देणगीदाते जयसन पाटील, शशीकांत मढवी व त्यांच्या पत्नी, खारेपाट विभाग संघटनेचे अध्यक्ष प्रकाश माळी व जनसेवा अकादमीचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवतेज युवा फाउंडेशनचे सचिव संदेश पाटील, सहसचिव पी. के. म्हात्रे, उपाध्यक्ष संदीप म्हात्रे व सहकारी उपस्थित होते.

आपण देखील सामाजाचे काही तरी देणे लागतो या जाणिवेतून स्वतःचा व आईवडिलांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करून त्याबदल्यात गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा जयसन पाटील व शेखर मढवी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एका तरी गरजू विद्यार्थ्याला शैक्षणिक मदत करावी अशी विनंती शिवतेज युवा फाउंडेशन रायगड संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली.
