सोमवारी होणार राजांच्या पुतळ्याचे आगमन
स्वागताची जय्यत तयारी, शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
शशिकांत मोरे
धाटाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपत्री शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे प्रत्येक शहरातलं एक धगधगतं ठिकाण असतं. रोह्याच्या कुंडलिका नदीच्या काठावर उभे राहिलेल्या शिवसृष्टीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय रेखीव असा पुतळा घडवण्याचे काम नुकतेच पुर्णत्वास आले आहे. पुण्यातील कला संस्कार स्टुडिओचे ख्यातनाम शिल्पकार महेंद्र थोपटे व त्यांचे सहकारी यांनी हा भव्य पुतळा साकारला आहे. सोमवारी रोहा-अष्टमी नगरपरिषदेने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या आगमनासाठी स्वागत सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्याला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, अनिकेत तटकरे तसेच समस्त शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत.
महाराजांच्या पुतळ्याची रोहा-मुरुड रस्त्यावर साई मंदिर ते पोलीस चौकी अशी मिरवणूक काढण्यात येणार असून आगमन सोहळा साजरा करण्यासाठी नगरपालिकेने कंबर कसली आहे. मिरवणूक मार्गावर सर्वत्र भगव्या पताका लागल्या असून ढोलपथक, झांज पथक तसेच विविध चित्ररथ यांच्या तयारीमुळे शहरात दोन दिवस आधीच मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या राजांच्या स्वागतासाठी सर्व नागरिकांनी पारंपारिक वेशभूषेत येऊन मिरवणूकीची शोभा वाढवावी असे आवाहन मुख्याधिकारी पंकज भूसे यांनी केले आहे.
नदी संवर्धन ठिकाणी शिवसृष्टी उभी रहाताना अनेक मंजुरींनंतर त्यावर काम सुरु झाले. मात्र, आता अतिशय रेखीव अशा महाराजांच्या पुतळ्याचे काम आकारास आले आहे. शिवसृष्टीमध्ये भव्य चबुतऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा हातात तलवार घेऊन उभा असलेला पुर्णाकृती पुतळा उभा केला जाणार आहे. उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची २५ फूट आहे. चबुतऱ्यासह पुतळ्याची एकूण उंची ५० फूट असेल. ब्राँझ या धातूपासून घडविलेला हा पुतळा ८.५ टन वजनाचा आहे. राज्यातच नव्हे तर देशात हा सर्वाधिक उंचीचा पुतळा ठरेल तसेच हा पुतळा म्हणजे देशात एक आदर्श शिवपुतळा ठरेल अशी भावना शिवप्रेमी व्यक्त करत आहेत.
या भव्यदिव्य पुतळ्यासाठी अंदाजे १.७५ कोटी रुपये खर्च झाला आहे. रोहा नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा अशी अनेक वर्षांपासूनची शिवप्रेमींची मागणी पुर्णत्वास येत असल्याने संपुर्ण तालुक्यात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.
