• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

ByEditor

Aug 25, 2024

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर दरवर्षीप्रमाणे खड्डयांचे विघ्न कायम आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (ता. २६) महामार्गाची पाहणी करणार आहेत. पहिल्या टप्प्यात पनवेल ते महाड दरम्यान दौरा असून त्याला दुपारी १२ वाजता पळस्पे येथून सुरुवात होणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाची पाहणी करण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

मुंबई-गोवा महामार्गाची गणेशोत्सवापूर्वी दुरुस्ती करण्यासाठी विविध संघटनांकडून कोकणात आंदोलने करण्यात येत आहेत. रखडलेले रुंदीकरणाचे काम आणि तात्पुरती डागडुजी होत नसल्यामुळे तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाहणी दौरा करणार आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मुंबई-गोवा आणि मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग
प्राधिकरण यांनी समन्वयाने प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. बैठकीत गणेशोत्सवापूर्वी महामार्ग खड्डेमुक्त करण्याबरोबरच बायपास आणि सर्व्हिस रोड सुस्थितीत ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले होते. या दुरुस्तीच्या कामांबरोबरच गणेशोत्सवानिमित्त इतर उपाययोजनांचीही मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत.
दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडीचा त्रास कायम आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या तोंडावर दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. यंदा गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असल्यामुळे तात्पुरत्या डागडुजीचे काम लवकर पूर्ण करावे, यासाठी माणगाव येथे नागरिकांनी महामार्गावरील
वाहतूक रोखून चक्काजाम केला होता.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!