अनंत नारंगीकर
उरण : सध्या गावागावात घरफोड्यांचे सत्र वाढले आहे. त्यातच शाळा, कॉलेजमधिल विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी व गाव, शाळा परिसरात करडी नजर ठेवण्यासाठी वेश्वी ग्रामपंचायतीनी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावात, शाळा परिसरात कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार किंवा छेडछाडची घटना घडली तर सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेरात बंदिस्त होणार आहे.
मुंबई व नवीमुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेला उरण तालुका आहे. या तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने खून, अल्पवयीन मुलीची छेडछाड, घरफोड्यांचे सत्र वाढले आहे. त्यामुळे उरण शहराबरोबरच गाव परिसरातील नागरिक हे दहशतीच्या छायेखाली वावरताना दिसत आहेत. वेश्वी ग्रामपंचायतीने यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी व सदर घटना उघडकीस याव्यात, घडणाऱ्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी गाव व शाळा परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. वेश्वी ग्रामपंचायतीच्या या जनहिताच्या उपक्रमाबद्दल सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.