अनंत नारंगीकर
उरण : शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचा नाहक त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. या संदर्भात अनेक वेळा उपाययोजना करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा संबंधितांकडून देण्यात आला. परंतु आजतागायत कोणत्याही प्रकारचे आंदोलन उभारण्यात आले नाही. त्यामुळे उरणकरांची अवस्था ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी झाली आहे.

वाढते औद्योगिकीकरण आणि नागरीकरण यामुळे उरण शहराची लोकसंख्या जवळपास पन्नास हजारांच्या घरात गेली असून प्रत्येकाच्या घरी दोन-चार दुचाकी आणि एक चारचाकी वाहन झाले आहे. त्यामानाने शहरातील रस्त्यांची संख्या वाढली नाही. त्यातच संथगतीने सुरू असलेले बायपास रस्त्याचे काम, राजपाल नाका, आपना बाजार, पालवी रुग्णालय या महत्त्वाच्या रस्त्यावर बेशिस्तपणे पार्किंग करण्यात येणारी वाहने, उरण नगरपरिषद, वाहतूक पोलीस तसेच संबंधित प्रशासनात समन्वयाचा अभाव त्यामुळे शहरातील रस्त्यांचे काही अंशी रुंदीकरण व काँक्रीटीकरण होऊनही गेल्या दोन चार वर्षात वाहतुकीची कोंडी वाढत चालली आहे. तरी गणेशोत्सवापूर्वी उरण शहरातील वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना करण्यासाठी उरणचे लोकप्रतिनिधी, उरण नगरपरिषद, वाहतूक पोलीस, संबंधित प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी
- झेब्रा क्रॉसिंग आणि पार्किंगच्या ठिकाणी पट्टे करावेत.
- सम आणि विषम तारखेला पार्किंगचे नियोजन करावे.
- काही रस्त्यावर एकेरी वाहतुक करणे आवश्यक.
- पार्किंगसाठी नवीन वाहनतळ किंवा जागा हवी.
- फेरीवाल्यांसाठी कायमस्वरूपी जागेचे नियोजन करावे.
- सार्वजनिक वाहतुकीकडे लक्ष द्यावे.
- जड वाहनांना शहरात सकाळी, संध्याकाळी प्रवेश देऊ नये.
- जुन्या वाहनांची नियमित तपासणी आवश्यक.
- बायपास रस्त्याच्या कामाला गती देऊन, पर्यायी रस्त्यांचा वापर वाढवणे गरजेचे आहे.
