• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आतुरता बाप्पाच्या आगमनाची!

ByEditor

Aug 31, 2024

रोह्यात गणेशमूर्तींवर केलेलं बारीक रेशीमकाम अनेक भाविकांचं आकर्षणाचं ठरतंय केंद्रबिंदू

रंगकामाचा शेवटचा हात फिरविण्यात मूर्तिकार व्यस्त

शशिकांत मोरे
धाटाव :
श्रावण महिना संपत आला असून पिठोरी अमावस्येबरोबर आता गणरायाचे आगमन काही दिवसांवर आलं आहे. या सणानिमित्त मुंबई, पुणे, कोल्हापूर सारख्या महानगरात मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. पण तळकोकणातील या सणाची नजाकत काही वेगळीच असून, बाप्पाचे आगमन म्हणजे लहान थोरांचा श्रध्देचा विषय आहे. एका वर्षाने बाप्पा आपल्या घरी येणार असल्याने महिला वर्ग घरातील साफसफाईच्या कामात व्यस्त आहेत तर मखर सजविण्यापासुन गणरायाच्या स्वागतासाठी स्वागत कमानी उभारण्यवर बच्चे कंपनीने भर दिला आहे. रोह्यात सध्या बाप्पांची मुर्ती साकारणाऱ्या कला केंद्रांमध्ये बाप्पांच्या मुर्त्यांवर शेवटची रंगरंगोटी करण्याचं कामही जोमात सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.

रोहा शहरासह ग्रामीण भागातून विविध कलाकेंद्रात सध्या गणेशमुर्तींवर शेवटचा हात फिरवला जात आहे. वरसे विभागात धाटावमध्ये यशवंत रटाटे, यदुराम रटाटे यांच्या नारायण कला केंद्र, किल्ला गावात वागळेकर यांचे अश्विनी कला केंद्र, तळाघर गावातील संदेश मोरे यांचे वरदविनायक कला केंद्र तर मनोज कळंबे यासह रोठ्खुर्द गावात मुकुंद मोरे यांचे पांडुरंग कला केंद्र आणि वरसे गावातील संदीप मेस्त्री यांच्या गणेश कला मंदिरात मुर्त्यांवर रंगाचा, हिऱ्यांचा साज चढविला जात आहे. मागील तीन पिढ्यांपासून बाप्पांच्या मुर्त्या साकारण्याचं काम या कला केंद्रातून होत असून ग्रामीण भागातील नागरिकांना परवडतील इतक्या रास्त किंमतीत या कला केंद्रात मुर्त्या बनविल्या जातात. केंद्रात तयार करण्यात येणाऱ्या आकर्षक गणेश मूर्तींमुळे या सर्वच केंद्रातील मुर्त्यांना ग्रामीण भागातून मोठी मागणी आहे.

ग्राहकांच्या मागणीप्रमाणे येथील मुर्त्यांची प्रतिकृती साकारली जात असून लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, कोळीवाड्याचा राजा, टिटवाळ्याचा गणपती तसेच इतर अनेक प्रकारच्या आणि विविध वेशभूषा असलेल्या आकर्षक मुर्त्यां याठिकाणी बनवून रंगांचा साज चढविला जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाडूच्या मातीचे दर आणि वाहतूक तसेच रंगाचे भाव वधारल्याने महागाईची झळ बसत असून गणेशमुर्त्यांचेही भाव वाढलेले आहेत. तरीही बाप्पाच्या मूर्तींना मोठी मागणी असल्याचे दिसत आहे.

रोह्यासह विभागातील कला केंद्रात तयार होणाऱ्या बाप्पांच्या सुबक आणि आकर्षक मुर्त्यांवर बारीक रेखीव काम करणारी मंडळी ही मागील तीन पिढ्यांपासून काम करीत आहेत. या कलाकेंद्रांमुळे तरुणांमध्ये मोठा उत्साह असल्याचे पहावयास मिळत आहे. तर बारीक रंगरंगोटी, डायमंड, आकर्षक कपडे परिधान केलेल्या मुर्त्यांना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्त्यांवर सुबक आणि रेखीव काम करण्याची जबाबदारी येथील मुर्तिकरांच्या कुटुंबातील लहान थोर मंडळीसह महिला वर्ग मोठ्या हिरहिरीने सहभागी होतात हे मात्र विशेष आहे.

तळकोकणात गणपती सणाची नजाकत काही वेगळीच असून बाप्पाचे आगमन म्हणजे लहान थोरांच्या एक श्रध्देचा विषय आहे. मागील एक वर्षापासून घेतलेल्या मेहनतीने त्याच एकाग्रतेने मूर्तीवर रेखाटणारे रंगकाम भरीत असताना या मूर्ती भक्तगण अगदी जबाबदारीने सांभाळून घेऊन, दूरवर गावोगावी जाऊन मनोभावे गणराया बरोबर गौराईलाही पूजतात, याचे मुर्तिकारांच्या चेहऱ्यावरील समाधान हे खूप काही सांगून जाते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!