• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावचे माजी सभापती प्रभाकर उभारे यांना पुत्रशोक

ByEditor

Aug 31, 2024

यज्ञेश उभारे यांचे अपघाती निधन, सर्वत्र हळहळ

सलीम शेख
माणगाव :
माणगाव पंचायत समितीचे माजी सभापती प्रभाकर उभारे यांचा सुपुत्र यज्ञेश उभारे याचे ऐन तारुण्यात अपघातात निधन झाल्याने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदरचा अपघात शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मुंबई- गोवा महामार्गावर माणगावजवळील नाणोरे गावाच्या हद्दीत घडला. या अपघाताची फिर्याद अमेय प्रभाकर उभारे (वय ३७ रा. माणगाव) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर अपघाताबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,अपघातातील आरोपी आप्रोज रशीद मुजावर (वय-२४, रा. दहिवली, ता. कर्जत) याने त्याच्या ताब्यातील अशोक लेलंड कंपनीची गाडी क्र. एमएच ४६ बीयु ५९१८ हि गाडी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अतिवेगाने चालवून विरुद्ध दिशेला येऊन मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे जाण्यासाठी समोरून येणारी दुचाकी क्र. एमएच ०६ सीए ८६८७ या गाडीला अपघात ठिकाणी आल्यावर समोरून धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार यज्ञेश प्रभाकर उभारे (वय २३, रा. खांदाड, ता. माणगाव) याला गंभीर स्वरूपाच्या दुखापती होऊन त्याचा मृत्यू होऊन दोन्ही वाहनाचे नुकसान झाले. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.२०१/२०२४ भा.द.वि. संहिता कलम १०६ (१),२८१,१२५ अ,१२५ ब,मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे करण्यात येऊन आरोपी आप्रोज रशीद मुजावर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा अधिक तपस सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत.

दरम्यान, कै. यज्ञेश उभारे याचे ऐन तारुण्यात अपघातात निधन झाल्याची माहिती माणगाव शहरासह तालुक्यात सर्वत्र पसरताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली. त्याच्या अपघाती निधनाने उभारे कुटुंबियांबरोबरच, मित्र परिवार तसेच माणगाव क्रिकेट असोसिएशनवर शोककला पसरली आहे. कै. यज्ञेश उभारे याच्यावर शनिवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी माणगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी अंत्यविधीला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!