समाजमाध्यमांवर मेसेज व्हायरल; चौकशीची मागणी
घनःश्याम कडू
उरण : तालुक्यातील कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न असलेल्या चाणजे ग्रामपंचायतच्या सफाई कामगाराला समुद्रकिनारी साफसफाई करताना अमेरिकन डॉलर सापडले असल्याचा मेसेज गेले दोन, तीन दिवसांपासून समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. तरी पोलिस यंत्रणेनी याची शहानिशा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सफाई कामगार हा समुद्रकिनारी साफसफाई करीत असताना अमेरिकन डॉलर सापडले असल्याचे समजते. सदर कामगार अशिक्षित असल्याने त्याने हे डॉलर ग्रामपंचायतमधील राजकीय नेत्यांच्या हातात दिल्यानंतर डॉलर खरे असल्याची ओळख पटवून घेतली. त्यानंतर त्यांनी कामगाराला दमदाटी करीत चालते करीत त्यावर कब्जा करून सदरचे डॉलर हे परस्पर वठविले असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
ग्रामपंचायत सफाई कामगाराला अमेरिकन डॉलर सापडूनही त्याची फसवणूक करून ग्रामपंचायतमधील राजकीय नेत्यांनी हि रक्कम परस्पर लाटली असल्याचे बोलले जात आहे. याची माहिती सफाई कामगाराला होताच त्याने विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे राजकीय नेतेमंडळी देत आहेत. याबाबत योग्य तो खुलासा झाला नाही तर आपण स्वतः याची माहिती पोलीस ठाण्यात देऊन लवकरच भांडाफोड करणार असल्याचे कामगाराने सांगताच अमेरिकन डॉलर वठविणार्या राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. तरी सदरच्या व्हायरल मेसेजची पोलिसांनी शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.