विधानसभा निवडणुकीपूर्वी महामार्गाचे काम पूर्ण करण्याचा लोकप्रतिनिधींचा मानस; ठेकेदारांना दिल्या सूचना
विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६च्या चौपदरीकरणाच्या कामाला गणेशउत्सवानंतर वेगाने सुरुवात करण्यात आली असुन या राष्ट्रीय महामार्गाचे काम विधानसभा निवडूनकीपूर्वी पूर्ण करण्याचा मानस लोकप्रतिनिधींचा असुन तशा सूचना ठेकेदारांना दिल्या असल्याचे सूत्रांकडून समजते.

विधानसभा निवडणूक ही नोव्हेंबरमध्ये लागू शकते, यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला फायदा व्हावा यासाठी मुंबई-गोवा मार्गाचे काम निवडणुकी अगोदर पूर्ण करावे लागणार आहे. हि बाब लक्षात घेत या मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी लोकनेत्यांचा प्रयत्न सुरु झाला असून मुंबई-गोवा महामार्गाचे कामाला जोरदार सुरुवात करण्यात आली आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला १६ वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. सुरवातीला हे काम खडीमिश्रित डांबरीकरण करुन करण्यात आले होते. परंतु, या मार्गांवरील अती पावसाने हा रस्ता टिकाव धरू शकला नाही. नंतर सर्व प्लॅन बदलून या महामार्गाचे काम सिमेंट काँक्रीटचे करण्याचा निर्णय घेण्यात आला.व महामार्गाच्या कामाला नव्याने सुरुवात करण्यात आली.
पावसाचा वेग कमी झाल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील काही अनधिकृत टपऱ्या हटवण्याचे काम सुरु आहे. तसेच या मार्गावरील इंदापूर, रातवड, तळवली, कोलाड, खांब, सुकेती खिंड, वाकण, नागोठणे या विविध ठिकाणी साईडपट्टयांची कामे, मोऱ्यांची कामे ब्रिजचे काम, उड्डाणपुलाचे काम, गटाराचे काम अतिवेगाने सुरु केले असुन हे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल असे या कामाच्या परिस्थितीवरुन दिसून येत आहे.