• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणचा ‘देवमाणूस’ गायब! गुंतवणूकदारांच्या मनसुब्यावर फेरले पाणी

ByEditor

Jul 18, 2023

लवकरच तक्रारी दाखल होतील; मध्यस्ती करणाऱ्यांचे धाबे दणाणले

घन:श्याम कडू
उरण :
कमी दिवसात पैसे दाम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नांचा गैरफायदा घेणारे काही कमी नाहीयेत. असाच प्रकार उरणमध्ये उघडकीस आला आहे. कोट्यवधी रुपयांचा गफला करून देवमाणूस समजला जाणारा सतीश गावंड पळाला असल्याचा समज झाला आहे. यामुळे देवमाणूस सापडत नसल्याने आपले पैसे मिळविण्यासाठी काल रविवारी गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा नेण्यासाठी जमा होण्याचे आवाहन व्हाट्सएपवरून फिरत होते. याची दखल उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी घेऊन जमावबंदी १४४ कलम लागू करून कोप्रोली येथे मोठया प्रमाणात पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला होता. यामुळे गुंतवणूकदारांच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे. सतीश गावंड यांच्याकडून तुमचे पैसे लवकरात लवकर मिळवून देतो, पण पोलीस ठाण्यात तक्रार करू नका असे हमी देणाऱ्यांनी आपली पोळी भाजून घेतल्याचे ठेवीदारांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे लवकरच ठेवीदार तक्रार दाखल करून देण्याची हमी देणारे यांचेही पितळ उघडे करणार असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे.

तालुक्यातील पिरकोन गावातील सतीश गावंड यांनी ५० दिवसांत दुप्पटीने पैसा देण्याचे आमिष दाखवीत गुंतवणूकदारांना आकर्षित केले. सुरुवातीला रक्कम मिळू लागल्याने गुंतवणूकदार वाढत गेले. हा व्याप वाढल्याने सतीश गावंडने गावोगावी एजंट नेमून त्यांच्या मार्फत कोट्यवधी रुपये गोळा केले होते. काही महिन्यांपूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन सतीश गावंड व त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर आपले गुंतवलेले पैसे मिळतील असे वाटत असताना, सतीश गावंड तारखावर तारीख देऊ लागला. त्यामुळे पैसे मिळण्याच्या आशा धूसर होत गेल्या. मात्र १६ जुलै रोजी गुंतवणूकदारांनी कोप्रोली नाक्यावर उपस्थित राहून एजंटांच्या घरी जाऊन पैसे वसूल करण्याचे आवाहन व्हाट्सएपच्या माध्यमातून करण्यात आले होते. याला उरण पोलिसांनी आक्षेप घेत मोठ्या संख्येने एकत्र येणाऱ्या गुंतवणूकदारांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कायदा हातात न घेता गुंतवणूकदारांनी उरण पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केले होते.

काल कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी रविवारी सकाळपासून कोप्रोली नाका येथे मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा सज्ज ठेवली होती. यामुळे कायद्याच्या कचाट्यात अडकण्यापेक्षा गुंतवणूकदारांनी न येणेच पसंद केले. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. गुंतवणूकदारांचा आकडे मोठे असल्याने ते पोलीस ठाण्यात तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. परंतु काही नामांकित मंडळी तुमचे पैसे लवकरच देतो असे सांगून वेळ मारून नेत आहे. परंतु आता गुंतवणूकदारांची फसवणूक होत असल्याने लवकरच ते तक्रार दाखल करणार असल्याचे गुंतवणूकदारांकडून सांगितले जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!