घनःश्याम कडू
उरण : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे इच्छुकांनी मोर्चे बांधणीस सुरुवात केली आहे. उरणमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा संपन्न झाला, त्यावेळी भरगच्च भरलेल्या सभागृहात उरण विधानसभा निवडणुकीत शेकापचे प्रितम म्हात्रे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी अनेक विरोधकांनी आमच्यावर याच सभागृहात टिंगल टवाळी सारखी वक्तव्य केली आहेत, त्यांनी ध्यानात घ्यावे मी उरण विधानसभा निवडणुकीत उभा राहून निवडून येऊन दाखवीन असा इशाराच भरगच्च भरलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शेकापचे प्रितम म्हात्रे यांनी दिला.

सदर मेळाव्याचे आयोजन जेएनपीटी सभागृहात करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी उरणचा आमदार कैसा हो, प्रितम म्हात्रे जैसा हो, बच्चा बच्चा कहता है, प्रितम म्हात्रे सच्चा है, लाल बावटे की जय, अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. यावेळी माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, पनवेल तालुका चिटणीस नारायण घरत, उरण तालुका चिटणीस विकास नाईक, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, युवक तालुका अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, माधुरी गोसावी, सीमा घरत, नाहिदा ठाकूर, आदींसह उरण विधानसभा मतदार संघातील प्रमुख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी शेकापमध्ये प्रवेश केला. तसेच अनेक नवीन पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. रायगडमधील उरण विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये लढत होणार आहे. यावेळी आपला पारंपारिक मतदारसंघ असल्यामुळे महाविकास आघाडी कडून उरण मधून शेतकरी कामगार पक्षालाच तिकीट मिळेल या अनुषंगाने शेतकरी कामगार पक्षाने उरण विधानसभा क्षेत्रात कंबर कसली आहे.
गणपतीमध्ये लोकांच्या भेटीगाठी घेण्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उरणचे विधानसभेचे उमेदवार प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी आघाडी घेतली आहे. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून आपण केलेले काम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळेच शेतकरी कामगार पक्षाला नवचैतन्य निर्माण झाले आहे. खालापूर, पनवेल आणि उरण या तिन्ही तालुक्यांमध्ये येणार्या गावांमध्ये भेटी देण्यात प्रितम म्हात्रे आघाडीवर आहेत. भेटी दरम्यान तरुण वर्गात त्यांच्या उमेदवारी बद्दल असलेला उत्साह शेतकरी कामगार पक्षातील तरुणांसोबतच आघाडी मधील इतर पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा दिसून येत आहे.
मी शेकापचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्षाने मला पनवेलचे नगराध्यक्ष व मुलगा प्रितमला दोन वेळा निवडून दिला आहे.त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली आहे. काहीजण आमच्यावर आरोप करीत आहेत, त्यांना करू दे. माझ्या मुलाला मी पडण्यासाठी उभा करीन का असा सवाल विरोधकांना करीत भाजपाने काय विकास केला हे आपण पाहिले आहेत. त्यांना विकास करायचा असता तर कधीच करंजा रस्ता केला असता. शासनाने विकासाच्या दृष्टीने रस्ते करण्यात आले असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करता केले. यावेळी कोणत्या ही परिस्थितीत विधानसभा ही जिंकण्यासाठी लढावयासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहाण्याचे आवाहन केले.
आमचा वाघ विवेक पाटील हे जरी आत असले तरी ते लवकरच बाहेर येऊन तीच भरारी पुन्हा घेतील हे विरोधकांनी ध्यानात घ्यावे. विरोधकांनी भाऊ जे. एम. म्हात्रे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला होता. यावरून विरोधकांना किती भीती वाटते हे उघड होते. याच सभागृहात काहींनी माझ्यावर पोस्टर हिरो अशी डॉयलॉगबाजी केली होती. त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत पाणी पाजून महाविकास आघाडीचा झेंडा उरण विधानसभा निवडणुकीत फडकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा प्रितम म्हात्रे यांनी विरोधकांना दिला आहे. यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी उरण विधानसभेसाठी महाविकास आघाडीतर्फे शेकापचे प्रितम म्हात्रे हेच उमेदवार असून ते नक्कीच विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.