• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सकारात्मक चर्चेनंतर लॉरी चालक मालक संघटनेचे आंदोलन २१ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

ByEditor

Oct 8, 2024

घन:श्याम कडू
उरण :
तालुक्यातील करंजा गावाच्या हद्दीमधील ‘करंजा इन्फ्रा’ कंपनीत स्थानिकांना काम मिळावे यासाठी सर्वपक्षीय पनवेल उरण ‘लॉरी चालक मालक संघटना’ आक्रमक होऊन त्यांनी कंपनीच्या गेटवर चक्काजाम आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी कंपनीने चर्चेसाठी बोलावून सकारात्मक चर्चा करून येत्या २१ ऑक्टोबर रोजी कंपनी मालकाबरोबर बैठक बोलविण्याचे आश्वासन दिल्यानंतर तूर्त आंदोलन स्थगित करून न्याय मिळाला नाहीतर येत्या २२ ऑक्टोबरपासून पुन्हा चक्काजाम आंदोलन उभारण्याचा इशारा पनवेल उरण लॉरी मालक चालक संघटनेचे अध्यक्ष संतोष घरत यांनी कंपनी प्रशासनाला दिला आहे.

करंजा इन्फ्रा कंपनीमधील ट्रान्सपोर्टचे काम ठेकेदार बाहेरील ट्रान्सपोर्टरकडून करून घेत असल्याने येथील स्थानिकाना काम मिळत नसल्याचा ठपका ठेवत, येथील पोर्टमधील कोळसा वाहतूक करण्याचे काम स्थानिक ट्रान्सपोर्टना मिळाले पाहिजे अशी मागणी पनवेल उरण तालुका लॉरी चालक मालक संघटनेनी केली होती. याबाबत कंपनी प्रशासनाबरोबर स्थानिक लॉरी चालक मालक संघटनेने वारंवार संपर्क साधून मालाची वाहतूक करण्याचे काम येथील स्थानिकांना मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु याला कंपनी प्रशासन जुमानत नाही. यामुळे पनवेल उरण लॉरी चालक मालक संघटनेत संतापाची लाट पसरली आहे.

कंपनीच्या गेट समोर मंगळवारी (दि. ८) उरण पनवेल ट्रक चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संतोष घरत यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय आंदोलन सुरू केले होते.उद्योजक जे.एम.म्हात्रे, शेकापचे युवा नेते प्रितम म्हात्रे यांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सुहास घरत, माजी अध्यक्ष रघुशेठ घरत, सुनील घरत, माजी सभापती नरेश घरत, कामगार नेते रवी घरत, पंडीतशेठ घरत, संकेत ठाकूर, सी जी घरत, रमाकांत म्हात्रे, बाळूशेठ घरत, प्रदिप शेठ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनिष पाटील, शाखा प्रमुख अविनाश म्हात्रे,माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, भगवान तांडेल, सुरेश पाटील, रुपेश पाटील, अरुण नाईक,सागर म्हात्रे, रोहित चंदणे सह इतर पदाधिकारी, स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते.

आंदोलनाची दखल कंपनी प्रशासनाने घेऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलाविले यावेळी कंपनीतर्फे हसमुख शहा यांनी कंपनीचे मालक परदेशात असून ते येत्या काही दिवसांत आल्यानंतर त्यांच्याबरोबर संयुक्त बैठक लावून योग्य तो मार्ग काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर तूर्त २१ ऑक्टोबर पर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी युवानेते प्रीतम म्हात्रे यांनी सनदशीर मार्गाने स्थानिकांना न्याय मिळावा. तो जर मिळत नसेल आम्ही स्थानिक प्रकल्पग्रस्त लॉरी चालक मालक संघटनेच्या पाठीशी राहून न्याय मिळवून देऊ असे सांगितले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष घरत यांनी २१ ऑक्टोबर रोजीच्या बैठकीत न्याय मिळाला नाहीतर यापेक्षा उग्र आंदोलन उभारले जाईल असा इशाराही यावेळी कंपनी प्रशासनाला दिला असल्याचे समजते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!