शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, त्वरित पंचेनामे करण्याची मागणी
विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात गेली पाच ते सहा दिवस परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असुन येथील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या तुफान पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. यामुळे नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जात असुन येथे १ लाख २४ हजार हेक्टर जमिनीवर भातशेती केली जात होती. यावर्षी भातशेतीचे प्रमाण घटले असुन ते ९८ हजार ४८७ हेक्टरवर आले आहे. याचे कारण वाढते औद्योगिकरण, शहरीकरण, शेतमजूरांची कमतरता यामुळे दिवसेंदिवस भात लागवड कमी होतांना दिसत आहे. असे असले तरी येथील लोकांचा शेती करणे हा मुख्य व्यावसाय आहे. यामुळे परिणाम कोणताही असो रायगड जिल्ह्यातील शेतकरी हा भातशेती करत असतो. यावर्षी पाऊस चांगला पडेल असा हवामान खात्याने अंदाज दिला होता, तो अंदाज खरा ठरला. भात लागवड ही चार ते पाच पुराचे दिवस वगळता वेळेवर पूर्ण झाली. भात लागवडीनंतर पावसाचा लपंडाव सुरु झाला. केव्हा जास्त तरी कधी अधूनमधून पाऊस गायब झाल्याने भातपिकावर करपा व तांबोरा रोग पसरल्याने उभे पीक वाया गेले.
पूर्वी हस्त नक्षत्रानंतर पाऊस पडत नव्हता, यामुळे भात कापणीला वेळेवर सुरवात केली जात होती व भात पिकही उत्तम प्रकारे येत होते. परंतु, परिस्थिती पूर्णपणे बदलत चालली आहे. हस्त नक्षत्रानंतरही परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे चांगले आलेले पिक जमीनदोस्त झाले असुन यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडांशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून नेला आहे. नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे शासनाकडून त्वरित करण्यात यावेत अशी मागणी शेतकरी वर्गातुन केली जात आहे.
ईडा पीडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे, ही म्हण उराशी बाळगून बळी राजा भातशेती करीत असतो. भातबियाणे, खते, मजुरीचे दर वाढले तरी यांना न जुमानता भातशेती केली जाते. कारण भातशेतीमुळे पूर्ण वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटतो. परंतु, एवढी मेहनत करूनही हातातोंडाशी आलेलं पिक निसर्गाच्या कोपामुळे एका क्षणात वाया गेलं असल्यामुळे शेतकरी वर्गाच्या डोळ्यात पाणी आले असल्याचे दिसत असून शासनाकडून त्वरित पंचनामे करावे.
-लिलाधर दहिंबेकर
शेतकरी, गोवे