कोलाड येथील घरफोडीचा गुन्हा देखील केल्याचे तपासात झाले निष्पन्न
विनायक पाटील
पेण : पेण चिंचपाडा येथील बाईच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या दोन सराईत सोनसाखळी चोरांना पेण पोलिसांनी पकडून गजाआड केले आहे. रायगड जिल्हयामध्ये वारंवार होणाऱ्या चेन स्नॅचिंगच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे यांनी वेळोवेळी सदरचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने दि. ११/१०/२०२४ रोजी सकाळी ७ चे सुमारास यांतील फिर्यादी रूपाली राजेंद्र विरकुड (वय ५९, रा. चिंचपाडा, ता. पेण) या मौजे चिंचपाडा, ता. पेण येथील चिंचपाडा ते ताबंडी व मोतीराम तलावाकडे जाणाऱ्या सिमेंटच्या रोडवरून मॉर्निंग वॉक करीत असताना फिर्यादीचे पाठीमागुन दोन अनोळखी इसम काळ्या व लाल रंगाचे मोटारसायकलवर येवुन फिर्यादी यांचे गळयातील मंगळसुत्र हिसकावुन चोरी केल्याने सदरबाबत फिर्यादी यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याबाबत गुन्हा दाखल करण्यात येऊन सदर गुन्ह्याचा तपास पेण उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फाडतरे यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांच्या सुचनांनुसार गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी व अंमलदार हे करीत होते. सदर गुन्ह्याचा तपास तांत्रिक विश्लेषण करून तसेच, गोपनीय माहितीच्या आधारे ७२ तासाच्या आत उघडकीस आणण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखा पेण यांना यश आले आहे.
सदर गुन्हयात आरोपीत अजय एकनाथ चव्हाण (वय २२ वर्षे रा. गहुंजे, ता. मुळशी, जि. पुणे) व आकाश पंजाबराव चव्हाण (रा. होराळे, पोस्ट वावोशी, ता. खालापुर) यांना अटक करण्यात आली आहे. सदर अटक आरोपीपैकी अजय चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर सासवड, कराड शहर, खंडाळा, सातारा, पुणे अशा ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपी यांनी तपासादरम्यान गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यात हिसकावुन चोरी गेलेले मंगळसुत्र व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकुण ९५,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक आरोपी यांचेकडे अधीक तपास केला असता त्यांनी कोलाड पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी, चोरीचा गुन्हा रजि.नं.०७८/२०२४ भा.न्या.सं. कलम ३३१ (४), ३०५(ए), ३(५) हा केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी पोसई समद बेग, पोसई प्रतिक पोकळे, सहा. फौजदर राजेश पाटील, पोह संतोष जाधव, पोह राजेंद्र भोनकर, पोह प्रकाश कोकरे, पोह अजिंक्य म्हात्रे. पोह सुशांत भोईर, सचिन व्हस्कोटी, पोना अमोल म्हात्रे, पोशि गोविंद तलवारे, मपोना सुप्रिया शिंदे, पोशि संदिप शिंगाडे यांनी या गुन्ह्याचा जलदगतीने तपास केला.