• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महेश बालदी यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध!

ByEditor

Oct 28, 2024

निवडणुकीत महेश बालदी यांचे काम करणार नसल्याचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले स्पष्ट

पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात पदाधिकारी कार्यकर्त्यांचा दृढ निश्चय

विठ्ठल ममताबादे
उरण :
महाराष्ट्रातील निवडणुकी संदर्भात सर्वच राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी जोरात सुरु आहे. सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले असून उरण विधानसभा मतदार संघातही विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते वरिष्ठांच्या आदेशाने कामाला लागले आहेत. उरण विधानसभा मतदार संघात आगामी होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात शिवसेना (शिंदे गट) पक्षाची भूमिका काय आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका काय आहे? पदाधिकारी कार्यकर्ते यांची भूमिका काय आहे? पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम करावे? आदी विषयासंदर्भात शिवसेना शिंदे गटातर्फे रविवार दिनांक २७/१०/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता रत्नेश्वरी मंदिर सभागृह, जसखार येथे पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाची भूमिका जाहिर करताना शिवसेना जिल्हाप्रमुख अतुलशेठ भगत यांनी भाजपने उमेदवारी जाहीर करताना शिवसेनेला विश्वासात न घेतल्याने शिवसैनिक नाराज असून महेश बालदी यांच्या उमेदवारीला जाहीर विरोध आहे असे सांगितले व निवडणुकीत महेश बालदी यांचे काम करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या मेळाव्या प्रसंगी शिवसेना (शिंदे गट) चे खालापूर विभाग प्रमुख निवेदिता कोंडीलकर, उरण तालुकाप्रमुख प्रणाली म्हात्रे, पनवेल तालुकाप्रमुख प्रगती ठाकूर, उरण उप तालुकाप्रमुख तृप्ती पाटील, उलवे शहर संपर्कप्रमुख सीमा धस, विभागप्रमुख गणेश घरत, चाणजे विभागप्रमुख अक्षय म्हात्रे, माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, माजी उपसरपंच नितीन पाटील, उलवे उप शहरप्रमुख सतिशीला कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रस्तावनेत उरण तालुका संपर्कप्रमुख दिपक ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबविलेल्या लोक कल्याणकारी योजनांची, मंत्री मंडळातील विविध निर्णयांची उपस्थितांना माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे नेतृत्व आहेत, त्यामुळे प्रत्येक घटकाला त्यांनी न्याय दिला. आपण सर्वांनी एकत्र येत शिवसेना पक्ष मजबूत करून एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाऊया. पक्षाचे आदेश शिरसावंद मानून काम करूया. रायगड जिल्ह्यात महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, भरत गोगावले यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी काम करूया असे आवाहन केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख अतुलशेठ भगत यांनी पदाधिकारी मेळावा घेण्यापाठीमागचे कारण स्पष्ट केले. त्यावेळी भाषण करताना अतुल भगत म्हणाले की, उरण विधानसभा मतदारसंघात भाजपने शिवसेनेला (शिंदे गटाला) विश्वासात न घेता उमेदवारी दिली. वास्तविक पाहता उरण विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीरंग बारणे यांना २०१९ च्या विधानसभेपेक्षा ३०,००० मते जास्त पडली आहेत. उरण विधानसभा मतदारसंघात ४०,००० हुन अधिक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. अन्य महिलांनी विविध योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला आहे. उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची चांगली पकड आहे. तळागाळात शिवसेनेचा प्रचार व प्रसार चांगल्या पद्धतीने झाला आहे. उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला तिकीट दिल्यास उमेदार १०० % निवडून येईल. शिवसेनेला येथे पोषक वातावरण आहे, मात्र एकनाथ शिंदे यांना विश्वासात न घेता भाजपने अगोदरच आपली यादी जाहीर करून उरण विधानसभा मतदार संघातून भाजपचे महेश बालदी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते या निर्णयामुळे नाराज आहेत. पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की उरण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडावे. मात्र, उरण विधानसभा मतदारसंघ भाजपला सोडल्याने पदाधिकारी, कार्यकर्तेही नाराज झाले आहेत. एकवेळ भाजप पक्षाचे उमेदवार महेश बालदी नको. दुसरा कोणताही स्थानिक भूमीपुत्राला भाजपमधून उरण विधानसभेसाठी तिकीट द्यावे. स्थानिक भूमीपुत्र असलेल्या व्यक्तीलाच भाजपमधून उमेदवारी द्या अशी भूमिका यावेळी वरिष्ठांच्या आदेशाने शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

शिवसेनेचा महेश बालदी यांना विरोध असल्यामुळे शिवसेना उरण विधानसभा मतदार संघात महेश बालदी यांचे काम करणार नाही असे अतुलशेठ भगत यांनी सांगितले. अतुलशेठ भगत यांनी सविस्तरपणे पक्षाची भूमिका पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली. या कार्यक्रमाँदरम्यान उरण मधील तरुणांनी व उलवे मधील महिला वर्गांनी शिवसेना शिंदे गटात मोठया प्रमाणात पक्ष प्रवेश केला. शिवसेनेने आपला पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा घेऊन आपली भूमिका जाहिर केल्याने महायुतीचे भाजपचे उमेदवार महेश बालदी यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!