• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

ByEditor

Nov 8, 2024

रुपेश पाटील यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून दिला राजीनामा

योग्यवेळी योग्य भूमिका घेणार असल्याचा पदाधिकाऱ्यांनी केले स्पष्ट

विठ्ठल ममताबादे
उरण :
उरण विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. सर्वत्र जोरात प्रचार सुरू असतानाच उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटात पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार संतापाची लाट उसळली आहे. शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी रुपेश पाटील यांच्या एकतर्फी, मनमानी व हुकूमशाही कारभाराला शिंदे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते कंटाळले असून त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता सर्व व्यवहार चालू असल्याने रुपेश पाटील यांच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करत उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सामुहीक राजीनामे दिले आहेत.

यामध्ये कृष्णा बा. पाटील – जेष्ठ नेते, राजन श. म्हात्रे – संपर्क प्रमुख उलवे, भरत देशमुख – उलवे शहर प्रमुख, अमित कमळाकर ठाकूर – उपतालुका प्रमुख उरण तालूका, प्रभाकर पाटील – विभागीय प्रमुख गव्हाण (उलवे), विजय पाटील – विभाग प्रमुख चिरनेर, सचिन पाटील – समन्वयक उरण तालुका, अनंता गडकरी – शाखा प्रमुख बामण डोंगरी, संतोष मोकल – शाखा प्रमुख तरघर, सचिन देशमुख – शाखा प्रमुख खारकोपर, ज्ञानेश्वर पाटील – शाखा प्रमुख मोरावे, रामदास पाटील – संघटक वहाळ ग्रामपंचायत, धनंजय कोळी – मोहा शाखा प्रमुख, अतिष ठाकूर – शाखा प्रमुख उलवे सेक्टर १९, प्रसाद पाटील – शाखा प्रमुख उलवे सेक्टर ५/६, सुरेंद्र ठाकूर – जसखार शाखा प्रमुख यांचा समावेश आहे. या सर्वांनी आपल्या पदाचा सामूहिक राजीनामा दिला आहे.

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर, कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत व सामूहिक राजीनामे देण्याबाबत उलवे हॉटेल स्वाद येथे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते कृष्णा बा. पाटील यांनी रुपेश पाटील यांच्या एकतर्फी व मनमानी कारभाराला कंटाळून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देत असल्याचे सांगितले.

आम्ही उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेना प्रदेश सचिव संजय मोरे साहेब, यांच्या सुचनेनुसार रायगड जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर यांच्या विश्वासू मध्यस्थीने आणि त्या वेळचे जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र थोरवे यांच्या खास उपस्थितीने कार्यरत झालो. गेली दोन वर्ष आम्ही सर्व पदाधिकारी व शिवसैनिक युवासेना नेते रूपेश पाटील यांच्या येथील भयानक राजनीतीने बाधीत होतो. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजनितीला बदनाम करणारी प्रत्येक कृती येथे ते करीत आहेत. वरिष्ठ पातळीवर पाटील यांच्या संघटनेला बाधक व विनाशकारी ठरनाऱ्या कृतीबाबत आनेक वेळा तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे आम्ही शिवसेनेचा व शिवसेना पदांचा सामुहिकरित्या राजिनामा देत आहोत असे कृष्णा पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. शिंदे गटाच्या या राजीनामामुळे महायुतीचे उमेदवारांना मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिंदे गटाचे सामूहिक राजीनामे हे शिवसेनेला देखील एक मोठा धक्का मानला जात आहे. पदाधिकारी कार्यकर्त्यावर अन्याय झाल्याने त्यांनी राजीनामा दिलेले असले तरी पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!