विनायक पाटील
पेण : पेणचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पेण विधानसभा समन्वयक शिशिर धारकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
शिशिर धारकर यांनी मागील वर्षी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. तेव्हापासून ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले होते. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपली नाराजी व्यक्त करीत त्यांनी आपल्या पेण विधानसभा समन्वयक पदाचा राजीनामा दिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राजीनामा देताना त्यांनी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठविला असून त्यात त्यांनी म्हटले आहे कि, या वर्षाच्या जानेवारी 2024 या महिन्यापासून मला सतत हेतु पुरस्कर दुर्लक्षित, (sidelined) बाजुला ठेवणे ही बाब सतत शिवसेना नेते अनंत गिते आणि त्यांच्याच सांगण्यावरुन पेण तालुक्यातील त्यांचे समर्थक / पदाधिकारी यांच्याकडून होत आहे. आपण शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यातले, आपल्याला महाराजांचा आदर्श म्हणजे स्वाभिमान हा सर्वप्रथम. माझा स्वाभिमानाला ही न पटणारी बाब असल्यामुळे मी पेण विधानसभा समन्वय या पदाचा राजिनामा देत आहे. मी स्वतः आपली व सगळ्या मान्यवरांची भेट घेऊन सर्वकाही तपशीलवार सांगिन. माझा राजिनाम स्वीकारावा ही नम्र विनंती.
अनंत गीते यांच्या सांगण्यावरून आपल्याला पक्ष कार्यापासून बाजूला ठेवले जात असल्याचा आरोप शिशिर धारकर यांनी करीत राजीनामा दिल्याने पेणच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.