वृत्तसंस्था
ठाणे : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची सुनामी आल्याची पाहायला मिळाले. या सुनामीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष पालापाचोळ्याप्रमाणे उडून गेले. महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत झाली असून त्यांना ५० चा आकडाही गाठता आलेला नाही. राज्यात कोणाचीही लाट नसताना तसेच महायुती सरकारने कोणतीही भरीव कामगिरी केलेली नसताना महायुतीने एतके प्रचंड यश मिळवल्याने विरोधकांकडून ईव्हीएम यंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शरद पवार यांनी ईव्हीएमबाबतच्या आरोपावर माहितीशिवाय भाष्य करण्यास नकार दिला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते, मुंब्रा-कळवा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरील मतमोजणीची आकडेवारी दिली आहे. या मतदारसंघातील तळनेर नावाच्या गावात एकूण मतदार ३९६ आहेत आणि गावात ३१२ जणांनी मतदान केले होते. मात्र उमेदवारांना पडलेली मते दुप्पट असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
“३१२ जणांनी मतदान केले असताना शिवसेना (UBT) – १९४, शिवसेना (शिंदे) – ३२६, अपक्ष (हर्षवर्धन जाधव) – १०४ असे मतदान झाले आहे. या तीनही उमेदवारांच्या मतदानाची बेरीज ६२४ इतकी होते. EVM वर मुळीच शंका नाही पण या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? लवकरच हे उघडकीस आणू!”, अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
याबरोबरच जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांत आलेल्या काही बातम्या शेअर केल्या आहेत. द वायरने दिलेल्या बातमीनुसार, महाराष्ट्रात ५ लाख ४ हजार ३१३ अधिकचे मतदान दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मतमोजणीतील मतदान यात तफावत असल्याचे या बातमीत म्हटले गेले. आव्हाड यांनी ही बातमी शेअर करत निवडणूक आयोगाला यावर स्पष्टीकरण देण्याचे आव्हान दिले आहे.
दुसरीकडे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही ईव्हीएमवर शंका घेतली आहे. “गुजराती ईव्हीएमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का?”, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. “नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच कशी? एका सामान्य नागरिकाने सदरील आकडेवारी पाठवत विचारलेला हा प्रश्न नक्कीच विचार करायला भाग पाडतो. निवडणूक आयोग तर समोर येऊन काय खरं – काय खोटं हे सांगायला तयार नाही. आयोग नेमकं काय लपविण्याचा प्रयत्न करत आहे? की लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा विडा आयोगाने उचलला आहे? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यातील सामान्य जनतेला हवी आहेत”. असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.