• Wed. Apr 9th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड मेडिकल असोसिएशनच्या वार्षिक क्रिकेट स्पर्धा संपन्न

ByEditor

Dec 6, 2024

कळंबोली संघाने मारली बाजी, पनवेल अ संघ उपविजेता

प्रतिनिधी
नागोठणे :
रिलायन्स नागोठणे क्रीडा संकुल मध्ये रायगड मेडिकल असोसिएशनच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा, शनिवार व रविवार (30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर) आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांचे २० संघ सहभागी झाले होते. रिलायन्स नगोठणे येथील डॉ. प्रशांत बारडोलोई व डॉ. सुनील व रिलायन्स इंडस्ट्रीजचे डेप्युटी जनरल मॅनेजर एच. आर. (कॉर्पोरेट अफेअर्स) रमेश धनावडे यांनी या क्रीडा सोहळ्याचे उदघाट्न केले.

यावेळी डॉक्टरांनी देखील त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्यावे व आपल्या आवडीचे खेळ खेळून जीवनाचा आनंद घ्यावा असे रायगड मेडिकलचे असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर निशिगंध आठवले यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील सर्व सुप्रसिद्ध डॉक्टरांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. रायगड मेडिकल असोसिएशनच्या या मानाच्या स्पर्धेत अलिबाग, पनवेल अ, पनवेल ब, पेण, कर्जत, खोपोली, कामोठे, कळंबोली, उलवे, महाड-पोलादपूर, माणगाव, म्हसळा-श्रीवर्धन, रोहा, तळोजा, मुरुड, उरण, रसायनी, खांदा कॉलनी व रिलायन्स नागोठणे इत्यादी संघांनी भाग घेतला होता.

सदर कार्यक्रमात रायगड मेडिकल असोसिएशनच्या 400 सदस्य डॉक्टरांनी उत्साहाने हजेरी लावली. सर्व खेळाडूंना टीशर्ट किट आयसिटिसीकडून व ट्रॉफी पॅसिफिक लॅबकडून देण्यात आले. हा वार्षिक क्रीडा सोहळा पार पाडण्यात असोसिएशनचे सेक्रेटरी डॉ. राजेंद्र चांदोरकर, खजिनदार डॉ. नवलकिशोर साबू, माजी अध्यक्ष डॉ. विनायक पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. राजाराम हुलवान, डॉ. वसीम पेशइमाम, डॉ. राजेश शिंदे, उरण मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. घनश्याम पाटील, डॉ पुरुषोत्तम भोईर, डॉ सचिन नाईक, डॉ. मिलिंद घरत, डॉ हेमंत गंगोलिया, डॉ रमेश पटेल, डॉ अमर पाटील, डॉ सिद्धार्थ कुलकर्णी, डॉ. ओंकार पाटील, डॉ. भूषण शेळके, डॉ. तुषार, डॉ. अंकित, डॉ. अक्षय कोळी व इतर मान्यवर तज्ञ डॉक्टर यांनी विशेष योगदान दिले. या स्पर्धेसाठी डॉ. एस. एन. तिवारी, डॉ. संजीव शेटकार, डॉ. महेंद्र दोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये कळंबोली संघाने बाजी मारून चषक पटकवला तर पनवेल अ संघाला दुसऱ्या पदावर समाधान मानावे लागले. डॉ. सचिन मोकल या स्पर्धेचे मॅन ऑफ द सिरीज ठरले. या क्रिकेट सोहळ्यात रायगड मेडिकल असोसिएशन स्पोर्ट्स सेक्रेटरी डॉ. संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा स्पोर्ट्स एडमिन कमिटी डॉ. राजेश शिंदे व टीम यांच्या सहयोगाने उत्तमरीत्या कोणालाही कसली इजा न होता ह्या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असोसिएशनचे सचिव डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. नवलकिशोर साबू यांनी केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!