मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच!
विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असून अपघाताची मालिका सुरूच आहे. सोमवार, दि. २ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ७.१५ वा. आंबेवाडी नाका येथील शिवकांत गॅरेज व विजय वाईन शॉप दुकानासमोर ट्रेलरनी मोटारसायकलस्वाराला जोरदार धडक दिल्याने या अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यु झाला.
याबाबत कोलाड पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, आंबेवाडी नाका येथे आपल्या ताब्यातील ट्रेलर वाहन चालक सायरलाल खमाण गुजर (वय ३३, रा. बहादूरपुरा, पो. दौलतपुरा, ता. मसुदा विजयनगर जि. अजमेर राजस्थान) ट्रेलर क्र आरजे ०६ जीडी ७७१४ यांनी रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मोटारसायकल क्र. एमएच ०३ डीटी ४१४८ चालक विजयकुमार सिन्नदुराई गोकगिलिखान (वय ३७, रा. सिन्नादुराई, स्टीट रोड व्हिएस पुरम विरथरेड डिपल्ली, तामिळनाडू) याला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याविषयी कोलाड पोलिस ठाण्यात ११३/२०२४ भारतीय संहिता २०२३ नुसार कलम १०६(१) २८१, १२५ (अ), १२५ (ब ) मो. वा. का. कलम १८४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असुन अधिक तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलीस ठाण्याचे अंमलदार एस. जी. भोजकर, अंमलदार सी. के. कुथे करीत आहेत.