• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

ByEditor

Dec 12, 2024

क्रीडा प्रतिनिधी
रायगड :
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या २३ वर्षाखालील मुलांच्या जिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेला सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील एकूण सोळा नामांकित क्लब,अकॅडमीच्या संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

सदरची स्पर्धा ४० षटकांची एकदिवसीय असून प्रथम साखळी व नंतर बाद फेरीनुसार आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धेत एकूण २७ एकदिवसीय सामने होणार आहेत. स्पर्धेत खेळल्या गेलेल्या सामन्यात खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर संघाची निवड करण्यात येईल व निवडलेल्या संघाचे पुढे सराव सामने व शिबिराचे आयोजन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम संघाची निवड करून रायगड जिल्ह्याचा संघ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित क्रिकेट स्पर्धेत सहभागी होईल. संपुर्ण स्पर्धेचे आयोजन खारघर येथील बी. पी. पाटील मैदान, घरत क्रिकेट मैदान, साई सुरज मैदान, ४० प्लस गावदेवी तेंभोडे मैदान पनवेल आणि पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर होणार आहेत. याआधी आरडीसीएतर्फे एकोणीस व सोळा वर्षाखालील मुला/मुलींच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.

गेल्या दोन महिन्यात विविध वयोगटातील क्रिकेट स्पर्धेत १०० पेक्षा जास्त एकदिवसीय सामने झाल्यामुळे जिल्हयातील गुणवान खेळाडूंना खेळण्याची संधी व प्रोत्साहन जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने देण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक यांच्यासह सर्व कार्यकारी मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!