• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव बसस्थानकातील गैरसोयींचा फेरा संपणार; नूतनीकरणासाठी दीड कोटी

ByEditor

Dec 16, 2024

ना. भरत गोगावले यांच्या प्रयत्नामुळे यश, प्रवाशांना मिळणार सुविधा

सलीम शेख
माणगाव :
माणगाव-महाड-पोलादपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री ना. भरत गोगावले यांच्या अथक प्रयत्नांनंतर माणगाव एसटी बस स्थानकाच्या नुतनीकरणासाठी तब्बल दीड कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे लाखो एसटी बस प्रवाशांचा गैरसोयीचा फेरा संपणार असून त्यांना सर्वतोपरी सुविधा मिळणार आहेत. या मंजुरीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

या नुतनीकरणाची निविदा यापूर्वीच प्रसिद्ध झाली असून लवकरच हे काम सुरू होणार आहे. गेल्या वर्षी बसस्थानका समोरील सिमेंट काँक्रीटकरणा साठी १६ लाख रुपये खर्च आला आहे. तर दोन महिन्यांपूर्वी काँक्रीटीकरणा साठी १ कोटी २ लाख रुपये मंजूर झाले होते. त्यांचे कामही काही दिवसांनी पूर्ण होणार आहे. असे एकूण २ कोटी ६२ लाख रुपये ना.भरत गोगावले यांनी मंजूर करून आणले आहेत. गेल्या २५ वर्षांपासून प्रवाशांना तुंबलेले पाणी, खाच खळगे आणि मोठमोठ्या खड्ड्यातून बस स्थानकात प्रवेश करावा लागत होता. यासाठी विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन केले होते. हे खड्डे कायमस्वरूपी नष्ट होण्यासाठी या आवाराचे काँक्रीटीकरण करण्यासाठी जिल्हा युवा सेना प्रमुख विपुल उभारे यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांनी ना.भरत गोगावले यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे माणगाव बस स्थानकांच्या काँक्रीटीकरण आणि नुतनीकरण मंजूर झाले आहे. यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

या नुतनीकरणासाठी मंडळाने १ कोटी ४४ लाख ३७ हजार ३०३ रुपये मंजूर केले आहेत. या कामात गटारे, प्लास्टर, छप्पर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाईट, फर्निचर, आसन व्यवस्था, विविध कक्ष आदी सर्व प्रकारच्या सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे हे स्थानक आधुनिक आणि सुसज्ज होऊन सुसाट धावणार आहे. हे बस स्थानक रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी असल्याने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. तसेच हे बस आगार सतत एसटीला फायदा मिळवून देणारे आहे. या बस स्थानकासाठी ५० वर्षांपूर्वी माजी आमदार स्व. अशोकदादा साबळे यांनी प्रयत्न केले होते. त्याचे भूमीपुजन १९८१ मध्ये तत्कालीन बांधकाम राज्यमंत्री स्व. रविंद्र राऊत यांनी केले होते. त्यानंतर आगारासाठी त्यांनी उपोषण केले होते. त्यानंतर ना. भरत गोगावले यांनी या स्थानकाचे नुतनीकरण मंजूर केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!