कचरा टाकणाऱ्या ७ जणांवर केलेल्या दंडात्मक कारवाईत ५५ हजार रक्कमेची वसूली
स्वच्छ्ता मोहिमेअंतर्गत पर्यावरणाचा ऱ्हास थांबणार
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दिवेआगर ग्रामपंचायतने परिसरात होणारा कचरा रोखण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. गाव स्वच्छ्ता मोहिमेअंतर्गत सूचना फलक लावून जनजागृती करत कचरा करणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार दोन आठवड्यात आतापर्यंत ७ जणांकडून ५५ हजारहून अधिकचा दंड ग्रामपंचायतने वसूल केला आहे.
देशभरात प्रसिद्ध असणाऱ्या दिवेआगर पर्यटन स्थळाला आता धार्मिक स्थळाची मोठी ओळख मिळत आहे. येथे हजारोंच्या संख्येने राहण्यासाठी लॉजिंग, निवास आणि न्याहरीचे हॉटेल असून घरगुती साधारण व त्या व्यतिरिक्त प्रमुख खानावळी सोबत अधिक दर्जेदार होम स्टे सुद्धा आहेत. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. मात्र, कचऱ्याच्या समस्येमुळे दिवेआगर पर्यटन स्थळाचे विद्रुपीकरण होत असताना ग्रामस्थांनी आपला परिसर नियमित स्वच्छता राखण्याचे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले. तरी कारवाईची भीती वाटत नसल्याने असंख्य प्रकारच्या प्लास्टिकचा भस्मासुर येथील रस्ता, नदी – नाल्यात पाहायला मिळत होता.
शेवटी दिवेआगरचा समुद्रकिनारा नेहमी स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक राहून सदैव पर्यटकांनी गजबजून जावा. यासाठी या पर्यटन स्थळाला जोडणारे बोर्लीपंचतन, भरडखोल व वाकडा पूल असे तीन मार्गावरील प्लास्टिक पिशव्या, खाद्यपदार्थाचे रॅपर्स, थर्माकोल, मिनरल वॉटर व कोल्ड्रिंक्सच्या बाटल्यामुळे होणारा कचरा रोखण्यासाठी दिवेआगर ग्रामपंचायतने दंडात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यात यश आले आहे. याचप्रमाणे तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीने गावाच्या स्वच्छतेसाठी दिवेआगर पॅटर्न राबवावा अशी मागणी जनमाणसातुन कऱण्यात येत आहे.
दिवेआगर हे पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आपला परिसर नियमित स्वच्छता राखण्याचे आवाहन करतो. अशाप्रकारे जर कोणाकडून कचरा टाकून दुर्गंधी पसरून पर्यटनाचा ऱ्हास होत असेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. यात कोणाचीही गय केली जाणार नाही.
-सिद्धेश कोसबे,
सरपंच दिवेआगर.
