रत्नागिरी : राजापूरचे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. राजन साळवी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यास कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान नव्या वर्षात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा अंतर्गत गोटात सुरु आहे. निवडणुकीत आणि निवडणूकनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याची भावना राजन साळवी यांच्या मनात असल्याचे म्हटले जाते. साळवी यांच्या कुटुंबियांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे राजन साळवी महिनाभरात मोठा निर्णय घेऊ शकतात असे म्हटले जाते.
राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून किरण सामंत यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यांनी बहुमताने राजापुरात विजय मिळवला आहे. तर किरण सामंत यांच्या विरुद्ध उभे राहिलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या राजन साळवी यांचा पराभव झाला आहे. चौथ्यांदा राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, मात्र 2024 च्या निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला आहे.