घनश्याम कडू
उरण : रविवारी दुपारच्या सुमारास उरण येथे आईवडिलांसोबत आलेली अल्पवयीन चिमुरडी बेपत्ता झाल्याने तारांबळ उडाली होती. त्यातच, स्थानिक रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानतेमुळे वाट चुकलेल्या मुलीला तिच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पनवेल तालुक्यातील कोन येथील एक परिवार हे उरण शहरालगत असलेल्या कोटनाका येथील नातेवाईकांच्या घरी आले होते. याचदरम्यान, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सात वर्षीय अल्पवयीन चिमुरडी बेपत्ता झाली होती. यामुळे, आईवडील आणि नातेवाईक यांनी चिमुरड्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी, त्यांनी कोटनाका रिक्षा स्टँड, उरण रेल्वे स्थानक आणि आसपासच्या परिसरात शोध घेत होते. यादरम्यान, उरण शहरातील राजपाल नाका येथे एक चिमुरडी वाट चुकली असल्याचा संशय स्थानिक रिक्षाचालकाला आल्याने त्याने त्या मुलीची विचारपूस केली. यावेळी, ती कोन गावाहून तिच्या आईवडिलांसोबत आल्याची माहिती देण्यात आली होती.
यामुळे, रिक्षाचालकाने प्रसंगावधान राखत आसपासच्या परिसरात तिच्या आईवडीलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला . परंतु, त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि त्याने जवळच असलेल्या दुकानदार पटेल यांना माहिती दिली. यावेळी, रिक्षाचालक आणि स्थानिक दुकानदार यांनी ‘चिमुरडी’ आढळून आल्याची माहिती स्थानिक व्हाट्सअप ग्रुपवर दिली असता काही वेळातच तिच्या वडिलांशी संपर्क करण्यात आला होता. त्यानंतर, मुलीची चौकशी करून वाट चुकलेल्या सात वर्षीय चिमुरडीला सुखरूप वडिलांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे पटेल यांनी सांगितले आहे. तर, या दरम्यान मुलगी बेपत्ता झाल्याने आईवडील आणि नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चुकल्याचे सांगण्यात आले आहे.