मिलिंद माने
मुंबई : रायगड व नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद झाला असतानाच व या नियुक्तीला लागलीच स्थगिती दिली असताना पुन्हा एकदा रायगडला आदिती तटकरे तर नाशिकला गिरीश महाजन हेच प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील महायुती सरकारने १८ जानेवारी रोजी राज्यातील पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली होती. या यादीवरून महायुती सरकारमधील शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात वाद झाला. या वादाची ठिणगी रायगड जिल्ह्यातील महाड येथे पडली. शिंदे गटातील रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदी नियुक्त झालेल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या नियुक्तीला विरोध केला व १९ जानेवारीच्या रात्रीच्या सुमारास गोगावले समर्थकांनी आदिती तटकरे यांच्या व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाडजवळील नडगाव येथे रास्ता रोको करून टायर जाळून महामार्ग तब्बल दोन तास रोखला. दुसऱ्या दिवशी शिंदे गटाच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र चालू केले. अखेर या वादामुळे राज्य शासनाने रायगडसह नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्ती तात्पुरती स्थगिती देणारा अध्यादेश काढला.

रायगड व नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद आणि नियुक्तीला स्थगिती दिल्यानंतर २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी रायगड येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व नाशिक येथे गिरीश महाजन हे ध्वजारोहण करतील अशा आशयाचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने राज्याचे अवर सचिव सुनील सोनार यांच्या आदेशान्वये २० जानेवारी रोजी काढले आहे.
रायगड व नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून वाद झाला असताना व त्याला स्थगिती आदेश दिले असताना पुन्हा एकदा त्याच मंत्र्यांना ध्वजारोहण करण्यास अनुमती देणारा अध्यादेश राज्य सरकारने जारी केल्याने राज्य सरकारमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
