क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पै. अन्वर बुराण माजी अध्यक्ष झुंझार युवक मंडळ यांच्या स्मरणार्थ चौदा वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय ४० षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे मंगळवार, दि. २८ जानेवारी रोजी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना अनिरुद्ध पाटील यांनी झुंझार युवक मंडळ पोयनाडचे मैदान हे जिल्ह्यातील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी असून झुंझारतर्फे सातत्याने युवा क्रिकेटपटूंसाठी विविध वयोगटातील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, ह्या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना मोठे व्यासपीठ, प्रोत्साहन व ओळख मिळून देण्याचे काम झुंझारचे अध्यक्ष अन्वर बुराण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक युवा खेळाडूंनी आपल्या आयुष्यातील पहिली लेदर बॉल क्रिकेट मॅच याच झुंझारच्या मैदानावर खेळली आहे. स्पर्धेत खेळलेले बरेच खेळाडू सध्या मुंबई व महाराष्ट्राच्या विविध ज्युनिअर वयोगटाच्या संघात स्थान मिळवताना दिसतात. ह्या स्पर्धेला रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनची अधिकृत मान्यता देताना आपल्या आनंद होत असल्याचे पाटील म्हणाले.

स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील १६ संघानी सहभाग घेतला असून प्रथम २४ साखळी फेरीचे, ४ उपांत्यपूर्व फेरीचे, २ उपांत्य फेरीचे व १ अंतिम सामना असे एकूण ३१ एकदिवसीय ४० षटकांच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा उद्घाटनीय सामना कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी लोधीवली व सागर कांबळे क्रिकेट अकॅडमी पनवेल या संघांमध्ये झाला. उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, उपाध्यक्ष राजेश पाटील, झुंझारचे सचिव किशोर तावडे, क्रीडा प्रमुख नंदकिशोर चवरकर, पोयनाड ग्रामपंचायतीचे सदस्य सुनील पाटील, माजी खेळाडू मुराद बुराण, अजय टेमकर, महेंद्र पालव, रिटायर्ड फौजी उदय चवरकर, पंकज चवरकर, ॲड. पंकज पंडित, संदीप जोशी, निशांत माळी, कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक समीर सुर्वे, पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक सागर कांबळे, सुरज चवरकर, राजेंद्र जाधव, आदेश नाईक उपस्थित होते.