• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेणमध्ये रंगणार कबड्डीचा थरार!

ByEditor

Jan 29, 2025

७ ते ९ फेब्रुवारीला होणार रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा

विनायक पाटील
पेण :
रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचा थरार छत्रपती संभाजी महाराज मैदान वाशी-वढाव रोड येथे दिनांक 7, 8 व 9 फेब्रुवारी २०२५ या दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेत १९२ पुरुष संघ व ३२ महिला संघाचा समावेश आहे. ५० पंचांच्या देखरेखीखाली या स्पर्धा होणार आहेत. एकूण ६ क्रीडांगण तयार करण्यात आली असून ५००० ते १०,००० प्रेक्षक क्षमता अपेक्षित धरून गॅलरीसह व्यवस्था करण्यात येणार आहे. व्हीआयपी व इतर वाहनांसाठी ३ गेट असून पार्किंग व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात येणार आहे. जयंतभाई पाटील, चित्राताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होणार असल्याची माहिती आस्वाद (पप्पूशेठ) पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जयभवानी वाशी, वरसुआई वाशी व वैकुंठदादा पाटील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज मैदान वाशी-वढाव रोड येथे दिनांक ७ ते ९ फेब्रुवारी या दरम्यान करण्यात आले आहे. त्याबाबत नियोजनासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यवाह आस्वाद पाटील, युवानेते तथा आयोजक वैकुंठ पाटील, भाजप सरचिटणीस मिलिंद पाटील, शरद कदम, परशुराम म्हात्रे, जगदिश पाटील, सुर्यकांत ठाकूर, निलेश पाटील, पद्माकर पाटील, संजय मोकल आदींसह आयोजक उपस्थित होते.

या स्पर्धेदरम्यान राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील, लोकसभा खासदार सुनील तटकरे, भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, मंत्री आदीती तटकरे, मंत्री भरत गोगावले, आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार जयंतभाई पाटील, चित्राताई पाटील, चित्राताई वाघ व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती वैकुंठ पाटील यांनी दिली.

यापूर्वी विजेत्या व उपविजेत्या संघांना फिरता चषक देण्यात येत होता. यावर्षी आणखी एक चषक देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!