प्रतिनिधी
मुरुड : सध्या जगामध्ये असंसर्गजन्य रोगाचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यापैकी कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण साधारणता नऊ टक्के आहे. त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध कार्यक्रम व उपक्रम हे राबवले जातात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दरवर्षी ४ फेब्रुवारी हा ‘जागतिक कर्करोग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी सर्व शासकीय दवाखाने आणि आरोग्य संस्था यामध्ये आरोग्य शिबीर घेऊन लोकांना जागरूक केले जाते. ह्या दिनानिमित्त लेडी कुसुम बेगम हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय, मुरुड जंजिरा येथे वैद्यकीय अधिक्षिका डॉक्टर उषा चोले व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पायल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी डॉक्टर पायल राठोड यांनी उपस्थित जमलेल्या सर्व नागरिकांना असंसर्गजन्य रोगांचे प्रकार, त्यांची वाढ होण्याची कारणे तसेच कर्करोगाबाबतची सविस्तर माहिती दिली.
राज्यात मुख्यतः मुख कर्करोग, स्तनांचा कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग यांचे सर्वात जास्त प्रमाण आढळून येत आहे. त्यामुळे तीस वर्षावरील लोकांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन डॉक्टर पायल यांनी दिले. यावर्षी सदर मोहिमे करता राज्य शासनाने “एकजूट होवु या, कर्करोगाला हरवूया!” हे घोषवाक्य निश्चित केले आहे. यामध्ये प्रामुख्याने कर्करोग सदृश्य आणि कर्करोग बाधित रुग्णांना योग्य निदान आणि उपचार देण्याकरता सर्व आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध आरोग्य सेवा, कर्करोग तपासणी, कर्करोग निदान व कर्करोग उपचार करण्यात येत असून याबाबत माहिती डॉ. उषा चोले यांनी दिली. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयातील व तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथील सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.