रविवार म्हणजे नॉन व्हेज असं समीकरण बहुतांश मराठी घरांमध्ये पाहायला मिळते. काहीजणांकडे तर रविवारी ठरवून नॉन व्हेज खाल्ले जाते. रविवारच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे घरामध्ये सर्वजण असतात. अशा वेळी आराम करायच्या दिवशी चमचमीत काहीतरी खायला मिळालं तर किती बरं होईल असं प्रत्येकाला वाटत असते.नॉनव्हेज आवडणाऱ्या लोकांना चिकनसारखे विविध प्रकारचे पदार्थ खायला आवडतात. मग ते ग्रील्ड चिकन असो की चिकन करी किंवा मसाला चिकन किंवा चिली चिकन, या पदार्थांचा आस्वाद मांसाहारी प्रेमी मोठ्या थाटामाटात घेतात.तुम्हालाही तुमचा रविवार स्पेशल करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल चमचमीत अशी चिकन रेसिपी घेऊन आलो आहोत.
साहित्य
- 1/2 किलो बॉयलर चिकन
- 2 उभे चिरलेले कांदे
- कोथिंबीर
- 4 चमचे पुदिना चटणी
- चवीनुसार मीठ
- 5-6 हिरव्या मिरच्या
- 2 चक्री फुल
- 2 हिरवी वेलची
- 2-3 तमालपत्र
- 1 चमचा गरम मसाला
- 1 चमचा धने पावडर
- 1 चमचा कस्तुरी मेथी
- 3 चमचे तेल
- 3 चमचे दही
- 2 चमचे आलं लसूण पेस्ट
कृती
- प्रथम चिकन धुवून त्यात मीठ, हळद, दही व अर्ध लिंबू पिळून 30 मिनिट मॅरीनेट करून घ्यावे.
- गॅस वर कढई ठेवून त्यात 2 चमचे तेल टाकून कांदा चॉकलेटी होई पर्यंत परतवून घ्यावा. मग मिक्सर भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर व भाजून घेतलेला कांदा टाकून व पुदिना चटणी टाकून पेस्ट करून घ्यावी.
- त्याच कढई मध्ये 1 चमचा तेल वाढवून मध्यम आचेवर तमालपत्र, चक्री फुल व वेलची चांगली परतवून घ्यावी. मग त्यात आलं लसूण पेस्ट टाकून परतवून घ्यावी. मग त्यात वाटलेला हिरवा मसाला ऍड करावा.
- हिरवं वाटण तेला मध्ये फ्राय झालं की त्याला छान हिरवा कलर येतो. मग त्यात धना पावडर, गरम मसाला, सुक्या नारळाचा किस, कस्तुरी मेथी ऍड करावी व चांगली ढवळून घ्यावी. चवीनुसार मीठ ऍड करावे. 3 ते 4 मिनिट मिश्रण चांगले परतवून घ्यावं.
- मग वरील मिश्रणात चिकन घालावे व चांगलं परतवून घ्यावे व स्लो गॅस वर 10 मिनिट चिकन शिजवून घ्यावे. चिकन शिजल्यावर छान पैकी चिकन ला तेल सुटलं. गरमा गरम तयार हिरवं चिकन. भाकरी, चपाती किंवा नान बरोबर हे एकदम छान लागत.