अनिकेत मोहित (श्रीवर्धन)
आजचे युग हे वेग, स्पर्धा आणि सातत्याने बदल स्वीकारण्याचे आहे. तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, जीवनशैली सर्वच क्षेत्रांमध्ये झपाट्याने बदल घडत असताना माणसाची मानसिकता मात्र अनेक ठिकाणी स्थिरावलेली, कधी कधी जाणीवपूर्वक थांबलेली दिसून येते. “जे आहे तेच ठीक आहे, वेगळं काही करायचं नाही” अशी समाधानाची मानसिकता समाजात बळावत चालली आहे. ही वृत्ती वैयक्तिक जीवनापुरती मर्यादित न राहता शिक्षणासारख्या मूलभूत आणि भविष्य घडवणाऱ्या क्षेत्रातही खोलवर रुजताना दिसते, ही बाब अधिक चिंताजनक आहे.
आज शंभर शिक्षकांपैकी एखादाच शिक्षक असा असतो, जो केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी झटत असतो. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांना विचारशील बनवणे, समाजाभिमुख घडवणे यासाठी तो शिक्षक वेळ, ऊर्जा आणि कधी कधी स्वतःचे वैयक्तिक आयुष्यही बाजूला ठेवतो. असा शिक्षक विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास संपादन करतो, त्याला मान-सन्मान मिळतो. परंतु दुर्दैवाने, हाच सन्मान आणि पसंती अनेक वेळा त्याच्याच सहशिक्षकांना खटकताना दिसते.
“आपणही त्याच्यासोबत राहून काहीतरी चांगलं करू” असा सकारात्मक विचार करण्याऐवजी “तोच का पुढे?”, “त्यालाच का मान?” अशा प्रश्नांमधून असूया, मत्सर आणि पाय खेचण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते. शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रातही ही मानसिकता शिरली आहे, ही खेदजनक बाब आहे. सहकार्य, संघभावना आणि सामूहिक प्रगती या मूल्यांचा अभाव असल्याने चांगले उपक्रम एकाकी पडतात आणि अनेक वेळा मोडीत निघतात.
भारतीय संस्कृतीत शिक्षकाला देवाचे स्थान दिले गेले आहे. “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः” या उक्तीमधून शिक्षकाच्या महत्त्वाचे वर्णन केले जाते. ज्ञान देणारा, अज्ञान दूर करणारा, योग्य दिशा दाखवणारा गुरु हा समाजाचा कणा मानला जातो. मात्र आज या पवित्र नात्यातही राजकारण शिरले आहे. शाळांमधील अंतर्गत गटबाजी, संघटनांचे राजकारण, पद, मान, समित्यांमधील स्थान, प्रशासकीय जवळीक अशा बाबींना शिक्षणापेक्षा अधिक महत्त्व दिले जात आहे.
या राजकारणाचा सर्वात मोठा फटका बसतो तो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर. शिक्षकांमधील मतभेद, हेवेदावे, वैयक्तिक स्वार्थ याचा थेट परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होतो. नावीन्यपूर्ण उपक्रमांना विरोध होतो, प्रयोगशील शिक्षक खचून जातो, आणि शेवटी “जसं चालू आहे तसंच चालू द्या” ही सुरक्षित पण घातक भूमिका सर्वत्र स्वीकारली जाते.
खरं तर, वेगवान युगात स्थिर राहणे म्हणजे मागे पडणे होय. शिक्षण क्षेत्रात तर बदल स्वीकारणे ही काळाची गरज आहे. एक शिक्षक चांगलं काम करत असेल, तर तो इतरांसाठी प्रेरणा ठरायला हवा, अडथळा नाही. त्याच्या यशात स्वतःचा वाटा शोधण्याची, त्याच्याकडून शिकण्याची आणि संघ म्हणून पुढे जाण्याची मानसिकता विकसित होणे अत्यंत आवश्यक आहे.
आज गरज आहे ती आत्मपरीक्षणाची. आपण शिक्षक म्हणून केवळ नोकरी करत आहोत की समाज घडवण्याची जबाबदारी स्वीकारत आहोत, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. राजकारण, असूया आणि स्थैर्याची मानसिकता बाजूला ठेवून जर शिक्षकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम केले, तरच शिक्षण व्यवस्था खऱ्या अर्थाने सक्षम आणि भविष्याभिमुख बनेल.
शिक्षक हा केवळ अभ्यासक्रम शिकवणारा नसून तो पिढ्या घडवणारा शिल्पकार आहे. त्या शिल्पकाराच्या हातात जर राजकारणाऐवजी संवेदनशीलता, समर्पण आणि सहकार्य असेल, तरच समाजाचे शिल्प सुंदर घडू शकेल. अन्यथा, वेगवान युगातही आपण विचारांनी आणि कृतीने मागेच राहू, हीच खरी शोकांतिका ठरेल.
याच मानसिकतेचा थेट परिणाम आज मराठी माध्यमातील शाळांवर होताना दिसतो. गुणवत्तेच्या नावाखाली इंग्रजी माध्यमाकडे होणारी पालकांची ओढ, नावीन्यपूर्ण उपक्रमांचा अभाव, अंतर्गत राजकारण आणि बदल स्वीकारण्याची अनिच्छा यामुळे मराठी शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. ही केवळ शाळांची नव्हे, तर भाषेची, संस्कृतीची आणि विचारांचीही गळती आहे. वेळेत आत्मपरीक्षण करून शिक्षण व्यवस्थेने दिशा बदलली नाही, तर भविष्यात मराठी माध्यम केवळ आठवणींत उरेल आणि ही जबाबदारी आपली सर्वांची असेल.
