• Mon. Jan 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शिक्षक दिन – माझ्या आयुष्यातील आदर्श शिक्षकांचा गौरव

ByEditor

Sep 5, 2025

ज दिनांक ५ सप्टेंबर २०२५. भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ, विचारवंत आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त आपण राष्ट्रीय शिक्षक दिन उत्साहाने साजरा करतो. त्यांच्या कार्याचा मी फारसा सखोल अभ्यास केलेला नसला तरी, त्यांचं जीवन आणि विचार शिक्षक या संकल्पनेला उच्च स्थान देणारे आहेत.

शिक्षक म्हणजे फक्त पाठ्यपुस्तक शिकवणारे नसून, आपल्याला स्वप्न पाहायला आणि ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी सतत प्रेरित करणारे व्यक्तिमत्त्व होय. माझ्या स्मरणात कायमचे राहणारे आणि माझ्या प्रेरणास्थानी असलेले पहिले शिक्षक म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले. समाजातील विरोधकांना न जुमानता त्यांनी शाळा सुरू केल्या आणि बहुजन समाजातील मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले. त्या खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक होत.

त्याचप्रमाणे, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानात सर्व समाजातील मुलांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केले. त्यांनी वसतीगृहांची उभारणी केली. समाजपरिवर्तन घडविण्यासाठी शिक्षणाचे महत्व ते जाणून होते. त्यामुळे ते देखील आमचे आदर्शवत शिक्षक ठरतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी सर्वोच्च गुरु आहेत. स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. त्यांनी १ ते १४ वयोगटातील मुलांसाठी मोफत शिक्षणाची तरतूद केली, तसेच वंचित समाजातील मुलांना शैक्षणिक व नोकरीसाठी आरक्षणाचा अधिकार दिला. त्यामुळे माझ्यासारख्या बहुजन समाजातील तरुणांसाठी ते महान शिक्षक आहेत.

माझे जीवन आणि शिक्षक

खरं सांगायचं झालं तर, प्रत्येकाच्या जीवनातील पहिले शिक्षक म्हणजे आपले आई-वडील. त्यांनी आपल्याला या जगाची ओळख करून दिली, संस्कार दिले आणि जीवनाची पायाभरणी केली. त्यानंतर माझ्या शिक्षण प्रवासात मला अनेक श्रेष्ठ शिक्षक लाभले.

  • माझ्या जिल्हा परिषद शाळेतील मुळे सर“आकाशी झेप घेणे पाखरा सोडून सोन्याचा पिंजरा” हे गीत आमच्या बालमनात रुजवले. चौथीत असताना स्कॉलरशिप परीक्षेला बसवले आणि अभ्यासाची गोडी निर्माण केली.
  • पाचवी ते सातवीत इंग्रजी शिकवणारे तोंडे सर.
  • आठवी ते दहावी दरम्यान आत्मविश्वास जागवणारे वर्गशिक्षक आगे सर, फावडे सर व मुख्याध्यापक यादव सर.
  • बी.एस्सी. मध्ये आत्मीयतेने शिकवणारे प्रा. तोष्णिवाल सर.
  • एम.एस्सी. दरम्यान मार्गदर्शन करणारे प्रा. डॉ. माने सर.
  • बी.एड. व एम.एड. च्या काळात दिशा दाखवणारे प्राचार्य डॉ. मुळावकर सर आणि डॉ. कांबळे सर.
  • सेट-नेट अवघड नाही हे पटवून देणारे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भोसले सर.
  • पीएच.डी. साठी प्रेरणादायी मार्गदर्शक, ज्ञ.प्राचार्य डॉ. राजेंद्र पवार सर.
  • माझ्या लेखनकौशल्याला चालना देणारे संपादक श्री. राजेंद्र घरत.
  • लेखनातील बारकावे सुधारायला मदत करणाऱ्या सौ. मिनाक्षी.
  • आणि आजच्या काळात मला नेहमी योग्य सल्ला देणारी माझी दोन लेकरं – डॉ. चैत्राली व इंजि. प्रज्वल – हेदेखील माझे शिक्षकच आहेत.

शिक्षक दिनाचा खरा अर्थ

माणसाच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर कोणी ना कोणी शिकवत असतो. काहीजण आयुष्यभर स्मरणात राहतात तर काहीजण क्षणभरासाठी येऊन दिशा दाखवतात. पण त्या सर्वांचं स्मरण आणि सन्मान करण्याचा दिवस म्हणजेच शिक्षक दिन.

या पवित्र निमित्ताने माझ्या सर्व शिक्षकांना, मार्गदर्शकांना, मित्रांना आणि गुरूंना मनःपूर्वक नम्र अभिवादन आणि शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹

– प्रा. डॉ. श्रीकृष्ण दिगंबर तुपारे
नागोठणे

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!