घनःश्याम कडू
उरण : रविवारी सकाळी अभ्यासासाठी आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना उरण नगर परिषदेच्या मासाहेब मिनाताई ठाकरे ग्रंथालयाचे कुलूपबंद दरवाजे पाहून निराश व्हावे लागले. नवीन वेळापत्रकानुसार शनिवारी अर्धा दिवस आणि रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ग्रंथालय बंद राहणार आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
ग्रंथालयाबाहेर लॉक असलेल्या प्रवेशद्वारासमोर उभ्या विद्यार्थ्यांचा फोटो हा या समस्येची तीव्रता स्पष्ट करणारा आहे. नोकरी करत अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी फक्त संध्याकाळी, पहाटे आणि सुट्टीचे दिवसच अभ्यासाचे एकमेव साधन असतात. आता रविवारी ग्रंथालय बंद राहिल्यामुळे आमच्या अभ्यासावर थेट परिणाम होणार आहे, असे एका विद्यार्थ्याने सांगितले. संध्याकाळी आणि आठवड्याभरातील गोंधळामुळे अभ्यास करणे कठीण झाले आहे. संपूर्ण आठवडाभर ग्रंथालयाशेजारील क्रीडा संकुलातील गोंधळामुळे शांततेत अभ्यास करणे कठीण होते. मात्र, रविवार आणि सुट्टीचे दिवस शांत वातावरण लाभायचे, त्यामुळे अनेक जण दीर्घ तास अभ्यास करू शकत होते. आता हा एकमेव शांत दिवसही हिरावला गेला आहे.
याशिवाय, माजी रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकाराने ग्रंथालयात आठवड्याच्या शेवटी विविध सामाजिक, आर्थिक आणि वैज्ञानिक विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन केले जात होते. या सत्रांमुळे विद्यार्थ्यांना परस्परांशी ज्ञानाची देवाणघेवाण करता येत होती, तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करता येत होते. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी, रायगड जिल्हाधिकारी आणि जिल्हा ग्रंथालय अधीक्षक यांना पत्र पाठवून जुने वेळापत्रक पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. ग्रंथालय म्हणजे ज्ञानाचे मंदिर असते, ते बंद करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी घातक आहे. अशा अडथळ्यांमुळे अभ्यासक्रमाचे नियोजन बिघडते आणि समाजाच्या प्रगतीलाही धक्का बसतो, असे एका विद्यार्थ्याने ठामपणे सांगितले. विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा निर्णय मागे घेण्याची जोरदार मागणी केली आहे. याबाबत नगरपालिका प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.