क्रीडा प्रतिनिधी
रायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने सोमवार, दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर महिलांच्या वरिष्ठ गटाचे प्रशिक्षण व निवड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या शिबिरामध्ये जिल्ह्यातील तज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शन करणार असून ह्याच शिबिरातून रायगड जिल्ह्याचा महिलांचा संघ निवडला जाणार आहे.
निवडण्यात आलेले संघ पुढील आठवड्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरजिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत सहभागी होईल. ह्या निवड चाचणीला कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. खेळाडुंनी स्वतः चे आवश्यक क्रिकेट साहित्य आणि क्रिकेटच्या पांढऱ्या गणवेशात सकाळी ९ वाजता उपस्थित रहावयाचे आहे. सोबत आपले आधारकार्ड, जन्माचा दाखला, स्वतः चा पासपोर्ट साईज फोटो घेऊन येणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीतजास्त महिलांनी सदरच्या शिबिरात सहभाग घेण्याचे आवाहन आरडीसीए महिला क्रिकेटच्या प्रमुख आदिती दळवी व आरडीसीएचे उपाध्यक्ष राजेश पाटील यांनी केले आहे.