सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील मोर्बा येथील एका ६८ वर्षीय वृद्धाने कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव येथील काळनदी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. सदरची घटना शुक्रवार, दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची खबर इब्राइम अब्दुल करीम गंगरेकर (६४), रा. मोर्बा ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील मयत लियाकत अलीअब्दुल करीम गंगरेकर (वय ६८), रा. मोर्बा, ता. माणगाव यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव माणगाव काळनदी पुलावरून उडी घेतल्याने त्यांना गंभीर दुखापत झाल्याने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत झाल्याचे सांगितले. या वृद्धाने आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला? याची चर्चा तालुक्यात सर्वत्र सुरु आहे. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि.नं.८ / २०२५ भा.न्या.सु.सं. चे कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार निमकर हे करीत आहेत.