• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पै. अन्वर बुराण स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेत सी. पी. गोयंका स्पोर्ट्स अकॅडमी उलवे विजयी; शौर्य घरतचे शतक

ByEditor

Feb 25, 2025

क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग :
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पै. अन्वर बुराण स्मृतीचषक चौदा वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय ४० षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीच्या सामन्यात सी. पी. गोयंका स्कूल स्पोर्ट्स अकॅडमी उलवे संघानी रायगड रॉयल्स संघावर १२३ धावांनी विजय मिळवला आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या सी. पी गोयंका स्कूल स्पोर्ट्स अकॅडमी उलवे संघानी ४० षटकांच्या समाप्तीनंतर ८ गडी गमावत ३०० धावा फलकावर नोंदवल्या. त्यामध्ये शौर्य घरत यांनी स्पर्धेतलं तिसरं शतक झळकावले. त्यांनी ११५ चेंडूचा सामना करत २१ चौकार व २ षटकार ठोकत १५० धावा केल्या. त्याला कर्णधार आरुष चामले यांनी ४४, वंश कडू यांनी ३७ धावांची साथ दिली. रायगड रॉयल्सकडून आरिफ खान यांनी ४ व निधी गद्रे व करण जळकर यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

प्रतिउत्तर देताना रायगड रॉयल्स संघानी ३९व्या षटकात सर्व गडी गमावत १७७ धावा केल्या. त्यामध्ये केदार म्हात्रे ४४, अंशुमान ठाकूर ३४, जयनील एस. यांनी २४ धावा काढल्या. सी. पी. गोयंका स्कूलकडून स्पंदन फाळके यांनी ३, शौर्य घरत व शिवराज तव्हरे यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. सामन्याचा सामनावीर म्हणून शौर्य घरत, स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू केदार म्हात्रे, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक मीरा शेळके, निधी गद्रे, विवान मांढरे, किमया कदम व आरिफ खान यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!