सलीम शेख
माणगाव : रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी अलिबागच्या चेअरमन पदासाठी निवडणूक जिल्हा उपनिबंधक सहकारी पतसंस्था रायगड प्र. का. जगताप यांचे अध्यक्षतेखाली व सहाय्यक निबंधक सहकारी पतसंस्था अलिबाग श्रीकांत पाटील यांचे उपस्थितीत पार पडली. सभेसाठी सर्व संचालक उपस्थित होते. त्यामध्ये संस्थेचे पॅनल प्रमुख व ज्येष्ठ संचालक राजेश सुर्वे यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं ते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे हे सन 1994 पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. अल्पावधीतच सन 2001 मध्ये प्रथम पतसंस्थेचे संचालक म्हणून निवडून आले आहेत. सन 2011 पासून पतसंस्थेचे पॅनल प्रमुख म्हणून काम पाहत आहेत .सन 2023 च्या झालेल्या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पॅनल प्रमुख म्हणून नेतृत्व केले आहे. पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ते पतसंस्थेमध्ये पाचव्यांदा संचालक म्हणून निवडून आलेले आहेत. सध्या ते पोलादपुर तालुक्यातील भोगाव खुर्द या शाळेवर पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
पतसंस्थेच्या कारभाराबरोबरच राजेश सुर्वे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाची सन 2016 पासुन यशस्वी धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आज शिक्षक परिषद ही संघटना 28 जिल्ह्यात अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असुन राज्यांतील शिक्षकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे काम आज शिक्षक परिषदेच्या माध्यमातून होत आहे.
अलिबाग शिक्षक पतपेढीमध्ये राजेश सुर्वे यांनी सन 2011 पासुन पॅनल प्रमुख म्हणून धुरा सांभाळत असताना पतपेढीमध्ये अनेक सभासदांच्या हिताच्या योजना राबविल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्वकाळात सन 1925 मध्ये संस्थेची स्थापना करण्यात आली. आज संस्थेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. संस्था शतक महोत्सव वर्षात वाटचाल करत आहे. संस्थेने गेल्या काही दिवसात सभासदांच्या माहितीसाठी संस्थेच्या नावाचे मोबाईल ॲप सुरू केले आहे. त्याच्या माध्यमातून सभासदांना आपली वैयक्तिक माहिती, शेअर्स संख्या, कायम निधी, कर्ज, आवर्त ठेव यांची घरबसल्या माहिती प्राप्त होत आहे. संस्थेने कोर बँकिंगच्या माध्यमातून NEFT/RTGS सुविधा सुरू केलेली आहे. संस्थेने सभासदांचा 13 अंकी डिजिटल अकाउंट ओपनिंग करण्यात आलेले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कर्ज देणारी व पारदर्शक कारभार म्हणून शिक्षक पतसंस्था अलिबागचा नावलौकिक आहे.
साधे कर्ज 2,00000/- (दोन लाख रूपये) 9% (नऊ टक्के) व्याजदराने शैक्षणिक कर्ज 5,00000/- (पाच लाख रुपये) 10% दहा टक्के व्याजदराने आणि प्रासंगिक कर्ज 23 लाख रुपये 10.75% (पावणे अकरा टक्के) व्याज दराने सभासदांना दिले जाते. सभासदांना बचतीची सवय व्हावी व आपल्या ठेवी संस्थेत गुंतवण्यासाठी 13 महिन्यासाठी वार्षिक 9% नऊ टक्के दराने व्याजदर दिला जातो. आज अनेक सभासद आपल्या ठेवी सुरक्षिततेच्या कारणाने संस्थेमध्ये गुंतवणूक करत आहेत. वेबसाईटच्या माध्यमातून जिल्ह्यातील नव्हे तर जगातील सर्व लोकांना संस्थेचा नावलौकिक व संस्थेच्या कारभाराची माहिती मिळावी व जास्तीत जास्त शिक्षक संस्थेचे सभासद व्हावेत यासाठी संस्थेने आपल्या नावाची वेबसाईट तयार केली. वेबसाईटच्या माध्यमातून 1925 पासून आजपर्यंत संस्थेचे झालेले सर्व चेअरमन व संस्थेने सभासदांच्या हितासाठी घेतलेले निर्णय, संस्थेचा ताळेबंद, नफा तोटा, संचालक मंडळाची माहिती सर्व सभासदांना खुली होणार आहे.
राजेश सुर्वे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर विविध माध्यमांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर निवडीवेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष उदय गायकवाड, जिल्हा कार्यवाह विजय पवार, संस्थेचे संचालक नरेंद्र गुरव, उमेश महाडेश्वर, जितेंद्र बोडके, भगवान घरत, रवींद्र पालकर, सुशील वाघमारे, निलेश साळवी, देवानंद गोगर, रेश्मा धुमाळ, राजेंद्र पाटील, प्रतिभा पाटील, प्रमोद भोपी, राजेंद्र फुलावरे, प्रफुल्ल पवार, बालाजी गुबनरे हे उपस्थित होते.