• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आडमार्गाला सिलेंडरची अदलाबदली….नक्की गौडबंगाल काय?

ByEditor

Mar 5, 2025

घन:श्याम कडू
उरण :
भारत पेट्रोलियमचे घरगुती गॅस सिलेंडर हे द्रोणागिरी नोडमध्ये रस्त्याच्या आडमार्गाला सिलेंडर अदलाबदल करीत होते. याबाबत कर्मचारी बोलण्यास तयार नाहीत. यावरून यामध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

घरगुती गॅस सिलेंडरमध्ये हेराफेरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये भरलेल्या गॅस सिलेंडर मधील गॅस रिकाम्या सिलेंडरमध्ये भरून त्याची विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत तक्रारी वाढल्याने शासनाने घरगुती गॅस सिलेंडर देताना वजन करून देणे सक्तीचे असतानाही उरणमधील गॅस सिलेंडर विक्रेत्यांकडून वजन न करता घरपोच सिलेंडर दिले जात आहेत.

भारत पेट्रोलियम गॅस सिलेंडरच्या बाबत अशा तक्रारी जास्त आहेत. या कंपनीचे कर्मचारी ग्राहकांशी उर्मट वर्तन करीत असल्याने नाराजीचा सूर निघत आहे. यापूर्वी ही करंजा परिसरात असलेल्या गोडाऊनमध्ये हेराफेरी केल्याच्या तक्रारी होत्या. परंतु आज मंगळवार दि. ४ मार्च रोजी दुपारी १ ते २ च्या दरम्यान द्रोणागिरी नोडमधील वर्दळ कमी असलेल्या ठिकाणी एका मोठ्या ट्रकमधून शकुंतला गॅस सर्व्हीसच्या छोट्या गाड्यांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची अदलाबदल केली जात होती. यावेळी कोणीही पहाण्यास नसल्याने काही भरलेल्या सिलेंडरमधून गॅस कमी करून रिकाम्या सिलेंडरमध्ये भरला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत चौकशी केली असता कर्मचारी बोलत नव्हते.

यामागे गौडबंगाल नसतं तर घरगुती गॅस सिलेंडर हे आडमार्गाला खाली करण्याऐवजी मुख्य रस्त्यावर करू शकले असते. यामुळे गॅस सिलेंडर विक्रेत्यांकडून काहीतरी हेराफेरी नक्कीच केली जात असल्याने ते आडमार्गाला घरगुती गॅस सिलेंडर अदलाबदल करीत असल्याचे बोलले जाते. तरी घरगुती गॅस सिलेंडर घरपोच डिलिव्हरी घेताना ग्राहकांनी वजन करून घ्यावेत. आसपासचे शेजारीही आडमार्गालाच घरगुती सिलेंडरची अदलाबदल केली जात आहे, याला दुजोरा देत आहेत.

याबाबत अधिकारी वर्गाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो होऊ शकला नाही. याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!