घन:श्याम कडू
उरण : बीड जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उरणमध्ये शिवसेना (शिंदे गट) पक्षातर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मात्र, या आंदोलनाच्या निमित्ताने उरणमधील शिवसेनेमध्ये (शिंदे गट) उफाळलेली गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. एकाच पक्षाचे दोन गट वेगवेगळ्या ठिकाणी निषेध करत असल्याने अंतर्गत मतभेद स्पष्ट झाले आहेत.
दोन वेगवेगळ्या निषेध सभा
संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ तालुकाप्रमुख महेंद्र पाटील आणि सुलेमान शेख यांच्या नेतृत्वाखाली उरण चारफाटा येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात युवा सेना सचिव रुपेश पाटील, उरण विधानसभा प्रमुख मनोज घरत, तालुका संघटक चंद्रकांत पाटील, चांजे विभागीय उपतालुका प्रमुख प्रशांत म्हात्रे, उपतालुका प्रमुख हेमंत भोईर, महिला आघाडीच्या बेबीताई पाटील यांसह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
तर दुसऱ्या गटाने तहसीलदार उद्धव कदम यांना निवेदन देत संतोष देशमुख हत्येतील आरोपी वाल्मिकी कराड याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या गटात उरण विधानसभा संपर्कप्रमुख रमेश म्हात्रे, तालुका संपर्कप्रमुख दीपक ठाकूर, सहसंघटक निखिल पाटील, महिला आघाडीच्या प्रणाली पाटील आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
गटबाजीमुळे पक्षातील अंतर्गत धुसफूस स्पष्ट
शिवसेनेतून फुटून शिंदे गटाने वेगळी वाट धरल्यानंतर केवळ तीन-चार वर्षांतच पक्षाच्या उरणमधील गटबाजी समोर आली आहे. विशेष म्हणजे, काही पदाधिकाऱ्यांनी दोन्ही गटांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी संपूर्ण कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे “हे नेमके कोणाच्या बाजूने आहेत?” अशी चर्चा पक्षात सुरू झाली आहे.
जर ही गटबाजी अशीच सुरू राहिली, तर शिवसेनेमधील (शिंदे गट) काही पदाधिकारी पक्ष सोडण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा उरणमध्ये रंगली आहे.