लेखक : श्री. भास्कर नेरुरकर,
हेड – हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम,
बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स
योग्य हेल्थ इन्श्युरन्स कव्हर मध्ये केलेली गुंतवणूक ही परिपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंगच्या दिशेने टाकलेलं महत्वाचं पाऊल ठरते. योग्य प्रकारे डिझाईन, सर्वसमावेशक हेल्थ कव्हर मुळे तुमच्या खिशाला आर्थिक भार न पडता कोणत्याही आपत्तीपासून संरक्षण मिळण्याची खात्रीशीर हमी प्राप्त होते. प्रत्येक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये काही क्लॉज आणि विशिष्ट संकल्पना असतात. तुमच्या पॉलिसीच्या योग्य आकलनासाठी त्या समजावून घेणे महत्वपूर्ण ठरते. यापैकी महत्वाची संकल्पना म्हणजे ‘वेटिंग पीरियड’ होय.
चला, हेल्थ इन्श्युरन्स मधील वेटिंग पीरियड म्हणजे काय? जाणून घेऊया? खरंतर नावावरुन तुम्हाला निश्चितच अंदाज आला असेल. वेटिंग पीरियड म्हणजे असा कालावधी ज्या दरम्यान पॉलिसीचे लाभ प्राप्त करण्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. हा पूर्व-निर्धारित कालावधी स्पष्टपणे पॉलिसी डॉक्युमेंट मध्ये नमूद केलेला असतो. पॉलिसी लागू झाल्याबरोबर वेटिंग पीरियडला सुरुवात होते.
विविध प्रकारचे वेटिंग पीरियड कोणते आहेत?
तुम्हाला निश्चितच ऐकून आश्चर्य वाटेल. वेटिंग पीरियडचे एकापेक्षा अधिक प्रकार आहेत. नेमका त्यांमधील फरक काय आणि कसे काम करतात? हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी मध्ये वास्तविकपणे काही प्रकारचे वेटिंग पीरियड दिसून येतात. चला, आपण प्रत्येकाविषयी निश्चितच जाणून घेऊया-
कूलिंग ऑफ पीरियड – हा प्रारंभिक वेटिंग पीरियड म्हणून सर्वत्र प्रचलित आहे. तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचा लाभ घेण्यास सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही हा पीरियड पूर्ण करणे आवश्यक ठरतो. स्टँडर्ड कूलिंग पीरियड हा साधारण 30 दिवसांचा असतो. या कालावधीच्या दरम्यान तुमच्या आजारपणासाठीच्या हॉस्पिटलायझेशन साठी तुम्ही कोणताही क्लेम करू शकणार नाही. तथापि, अपघाताच्या स्थितीतील हॉस्पिटलयाझेशन साठी तुम्ही 0 दिवसांपासून क्लेम दाखल करण्यास सुरुवात करू शकतात. अपघाती हॉस्पिटलाझेशनच्या स्थितीत 30 दिवसांचा वेटिंग पीरियड लागू होऊ शकत नाही.
पूर्व विद्यमान आजारांसाठी वेटिंग पीरियड – पूर्व विद्यमान आजार म्हणजे हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करण्यापूर्वी पॉलिसीधारकाला असलेले आजार किंवा आरोग्य स्थिती होय. तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला निदान झालेल्या कोणत्याही आजारास पूर्व विद्यमान आजार म्हटले जाते. जसे की, रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड आणि अस्थमा यांचा समावेश होऊ शखतो. या आजारांसाठीचा वेटिंग पीरियड साधारण 2 ते 4 वर्षापर्यत असू शकतो.
आजार विशिष्ट वेटिंग पीरियड – इन्श्युरर्सद्वारे हर्निया, मोतिबिंदू, सांधेरोपण शस्त्रक्रिया इ. सारख्या विशिष्ट आजारांसाठी वेटिंग पीरियड निश्चित केला जातो. हा वेटिंग पीरियड साधारण 2 ते 4 वर्षांपर्यंत असू शकतो. प्रत्येक इन्श्युरर कडे आजारांची यादी असते. ज्यांच्यासाठी इन्श्युअर्डने वेटिंग पीरियडचे पालन करणे आवश्यक ठरते. ही लिस्ट तुमच्या पॉलिसी डॉक्युमेंट मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात येते. प्रत्येक आजारासाठीचा वेटिंग पीरियड देखील स्पष्टपणे नमूद केलेला असतो.
मॅटर्निटी लाभांसाठी वेटिंग पीरियड – हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमधील मॅटर्निटी कव्हरमध्ये सामान्यपणे 9 महिने ते 6 वर्षांपर्यंत वेटिंग पीरियड असतो. याचा अर्थ असा की तुम्ही निर्धारित कालावधी पूर्ण केल्यानंतरच मॅटर्निटी संबंधित क्लेम दाखल करू शकता.
मानसिक आजारासाठी वेटिंग पीरियड – नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार हेल्थ इन्श्युरन्स अंतर्गत मानसिक आजार अनिवार्यपणे कव्हर केला जातो. अशा आजारासाठी वेटिंग पीरियड हा सामान्यपणे 2 वर्षे आहे; तथापि, ते इन्श्युरर निहाय बदलू शकते आणि तो पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये नमूद केला जाईल.
वेटिंग पीरियड कमी करण्याचे कोणते मार्ग आहेत का?
होय, तुम्ही अतिरिक्त प्रीमियम भरून काही वेटिंग पीरियड कमी करू शकता. तुम्हाला किती कपात मिळू शकते, हे इन्श्युररनुसार आणि प्रॉडक्ट निहाय बदलू शकते. तुम्ही तुमच्या इन्श्युररसह तपासू शकता आणि अतिरिक्त प्रीमियम भरून कमी वेटिंग पीरियडचे लाभ प्राप्त करू शकता.
जेव्हा तुम्ही हेल्थ इन्श्युरन्सची खरेदी कराल तेव्हा निश्चितपणे वेटिंग पीरियड बाबत काळजीपूर्वक माहिती घ्या. तसेच तुमच्या कव्हरेज बाबत स्पष्ट कल्पना येण्याच्या हेतूने पॉलिसी डॉक्युमेंट काळजीपूर्वक वाचण्याचा देखील सल्ला दिला जातो. पॉलिसी कॉपीमध्ये स्पष्टपणे कव्हर, अपवाज आणि अन्य अटी-शर्ती स्पष्ट शब्दांत मांडलेल्या असतात. जेणेकरुन पॉलिसीधारकाचा कोणताही गोंधळ होणार नाही. या लेखामुळे तुम्हाला हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे परिपूर्ण आकलन होण्यास निश्चितच मदत झाली असेल अशी आशा व्यक्त करतो.