रुग्णालयातील समस्यांबाबत विपुल उभारेंनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले निवेदन
सलीम शेख
माणगाव : माणगांव उपजिल्हा रुग्णालयात दर महिन्याला १०० ते १५० महिला भगिनींच्या प्रसूती होत असल्यामुळे पुर्णवेळ स्त्रीरोगतज्ञाची उपलब्धता असणे गरजेचे आहे. पंरतु गेली २-३ वर्षे पुर्णवेळ स्त्रीरोगतज्ञ उपलब्ध नसल्यामुळे माणगांव तालुका तसेच परिसरातील महिला भगिनींची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते, त्याबाबत नागरीकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. या रुग्णालयात राष्ट्रीय सेवा मिशन अंतर्गत कंत्राटी तत्वावर माणगांव मधील स्थानिक स्त्रीरोगतज्ञ डॉ. श्रुती निकम या प्रसुतीसेवा देण्याचे काम करीत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत डॉ. श्रुती निकम यांच्याकडून होत असलेली प्रसुतीसेवा उल्लेखनीय आहे. मात्र रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता एकाच स्त्रीरोग तज्ञावर अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे पूर्णवेळ स्त्रीरोग तज्ञची नेमणूक करावी तसेच उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना भेडसावणाऱ्या विविध समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी दक्षिण रायगड युवा सेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) विपुल उभारे यांनी रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
मुंबई–गोवा महामार्गावील माणगाव उपजिल्हा रुग्णालय हे रुग्णासाठी महत्वाचें असून येथे प्रसूतीसाठी महिला रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. मात्र याठिकाणी स्त्रीरोग तज्ञ पूर्ण वेळ नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. सध्या राष्ट्रीय सेवा मिशन अंतर्गत कंत्राटी तत्वावर माणगांव मधील स्थानिक स्त्रीरोगतज्ञ डॉ. श्रुती निकम या प्रसुतीसेवा देण्याचे काम करीत आहेत. मात्र पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ञ नसल्याने त्याच्यावर जास्त कामाचा ताण पडत आहे. याठिकाणी तात्काळ नवीन पुर्ण वेळ स्त्रीरोगतज्ञ उपलब्ध झाल्यास महिला भगिनींची होणारी गैरसोय थांबवता येईल. या रुग्णालयात नवजात बालकांसाठी ‘नवजात अतिदक्षता विभाग’ असून सुध्दा बालरोगतज्ञ नसल्यामुळे प्रसुतीनंतर नवजात बालकांना तपासणीसाठी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागते. नवजात बालकांवर उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालयात होणारा कित्येक हजारोंचा खर्च सर्वसामान्य कुटुंबातील पालकांना परवडणारा नसल्यामुळे ऐनवेळेस आर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर येते. माणगांव उपजिल्हा रुग्णालयात पुर्णवेळ स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, जनरल सर्जन, भुलतज्ञ, भिषक या पदांवर प्राधान्याने नेमणूक केली जावी अशी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी माणगांव तालुका तसेच समस्त नागरीकांची आग्रही मागणी आहे.
माणगांव उपजिल्हा रुग्णालय हे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून मुंबई-गोवा महामार्गालगत आहे, महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन व तंत्रज्ञ तात्काळ उपलब्ध करण्यात यावेत. रुग्णालयात सोनोग्राफी मशिन असून सुध्दा तज्ञ उपलब्ध नसल्यामुळे त्याचा रुग्णांना फायदा होत नाही म्हणून सोनोग्राफी-रेडीओलॉजीस्ट तज्ञ पदावर तात्काळ नेमणूक करण्यात यावी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सामान्य नागरीकांच्या हीतासाठी, कल्याणासाठी काम करणारे आहे. म्हणूनच आपल्या माध्यमातून माणगांव उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था, यंत्रणा ही बळकट होईल व जनसामान्य, गोरगरीब रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त व प्रभावी ठरेल असेहि निवेदनात म्हटले असून आ. भरत गोगावले, युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारीणी सदस्य विकास गोगावले तसेच शिवसेना युवासेना महिला आघाडी नजीकच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून लक्ष वेधणार असल्याचे उभारे यांनी निवेदनात म्हटले आहे.