अनंत नारंगीकर
उरण : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या खोपटा ते कोप्रोली रस्त्यावरील खाडी पुलावर भगदाड पडल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे. विद्यार्थी वर्ग व तसेच अन्य लोकांची मोठी वर्दळ असणाऱ्या या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

उरण तालुक्यातील खोपटा पुल ते कोप्रोली परिसराकडे जाणारा हा रस्ता अलीकडे नेहमीच वर्दळीचा ठरला आहे. त्यात रात्री अपरात्री अवजड वाहनांची संख्या वाढत असल्याने या मार्गावरील पूल कमकुवत झाला आहे. यासंदर्भात प्रवासी नागरीक, ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वेळोवेळी लक्ष वेधले, मात्र सदर पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट न केल्याने तसेच याकडे दुर्लक्ष झाल्याने पूल अधिकाधिक खचत गेला आहे. त्यात साईडपट्टी उखडली आहे. सद्यस्थितीत पुलावर भगदाड पडले असून, ही परिस्थिती अशीच राहिली तर रात्री अपरात्री सदर भगदाड मोठे होऊन याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘बांधकाम’चे झोपेचं सोंग!
खोपटा पुल ते कोप्रोली हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. विद्यार्थी वर्गासह ग्रामस्थांना उरण शहरात, जेएनपीए बंदराकडे येण्यासाठी सोयीचा आणि जवळचा हा मार्ग आहे. चिरनेर ते दिघोडे या वर्दळीच्या मार्गाला हा पर्यायी व सुरक्षित रस्ता आहे; मात्र रस्त्याची ही परिस्थिती होईपर्यंत बांधकाम विभाग झोपेचं सोंग घेऊन बसल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. तरी अपघात होण्याची वाट न पाहता सदर पुलाच्या जवळील भगदाड व उखडलेली साईडपट्टी दुरुस्त करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
-दिपक पाटील
मा. उपसरपंच