अलिबाग : मांडवा जेटीपासून एक ते दीड किमी अंतरावर आज थरारक घटना घडली. गेट वे ऑफ इंडियाहून मांडवाच्या दिशेने 130 प्रवाशांना घेऊन निघालेल्या अजंठा कंपनीच्या फायबर बोटीला अचानक होल पडला. त्यामुळे पाणी आत शिरू लागले तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोट हेलकावे खाऊ लागली. त्यावेळी बोटीमध्ये तब्बल १३० प्रवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजठा कंपनीची प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडियाहून 130 प्रवाशांना घेऊन 5.30 च्या सुमारास मांडवा येथे जाण्यासाठी निघाली होती. साधारण 1 ते 1.5 किमी अंतरावर बोट गेली असता वाऱ्यामुळे समुद्राच्या लाटा बोटीला जोरजोरात धडकू लागल्या. बोट फायबरची असल्यामुळे बोटीला छिद्र पडले आणि त्यामुळे बोटीमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे घाबरलेल्या प्रवशांनी तत्काळ मांडवी जेटी येथे फोन करून मदत मागितली. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता मांडवी जेटीवरुन तत्काळ स्पीड बोट समुद्रात मदतीसाठी धावल्या. 130 प्रवशांना सुखरुप मांडवी जेटी येथे आणण्यात आले आहे. तसेच अजंठा कंपनीची बोटही सुखरूप मांडवी जेटी आणली आहे.